नवी दिल्ली : सध्या गाजत असलेल्या मुंबई क्रुझ ड्रग्स प्रकरणामध्ये पुढच्या काही दिवसांत मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे. आता या प्रकरणाचा तपास एनसीबीकडून राष्ट्रीय तपास यंत्रणाकडे सोपवण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. एका वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. या रिपोर्टनुसार या प्रकरणाची लिंक आंतरराष्ट्रीय रॅकेटशी संबंधित असण्याची शक्यता आहे. या हायप्रोफाईल प्रकरणामध्ये एक मोठा कट आणि देशावरील संभाव्य धोका विचारात घेऊन हा तपास एनआयएकडे देण्यात येऊ शकतो. तत्पूर्वी मुंबई ड्रग्स केस प्रकरणाच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते
सूत्रांनी सांगितले की, एनआयएची टीम नुकतीच एनसीबीच्या विभागीय कार्यालयात आली होती. तसेच येथे एनआयएने सुमारे दोन तास माहिती घेतली. मुंबईत एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली ड्रग्स केसमध्ये छापेमारी करण्यात आली होती. मात्र या तपासावरून समीर वानखेडेंना अनेक आरोपांचा सामना करावा लागत आहे. या प्रकरणातील एक साक्षीदार प्रभाकर साईल याने वानखेडे यांच्यावर २५ कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला होता. त्यानंतर प्रभाकर साईल हा भूमिगत झाला आहे. दरम्यान, एनआयएकडे तपास सोपवण्याबाबतचे नोटिफिकेशन लवकरच निघू शकते.
तर या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यास एनसीबी आक्षेप घेऊ शकते. एनआयएचा हा हस्तक्षेप एनसीबीच्या अधिकारक्षेत्राला कमकुवत करू शकतो. तसेच भविष्यातील अन्य तपासामध्ये संस्थेच्या प्रतिष्ठेला धक्का देऊ शकतो. एका अधिकाऱ्याने सांगितले की, आतापर्यंतच्या तपासामध्ये त्यांना कुठलाही दहशातवादी अँगल मिळालेला नाही.