उत्तर प्रदेशातील मृतदेह गंगेच्या पाण्यासोबत पश्चिम बंगालमध्ये; ममता बॅनर्जींचा योगींवर संताप
नवी दिल्ली – देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने दोन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर तीन लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये मृतदेह नदीत वाहत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी योगी सरकारवर हल्लाबोल केला आहे. उत्तर प्रदेशमधून येणाऱ्या नद्यांमधून मृतदेह पश्चिम बंगालमध्ये येत असल्याचं म्हटलं आहे. तसेच कोरोना रुग्णांचे मृतदेह असल्याने कोरोना संक्रमणाचा धोका अधिक असल्याचं म्हटलं आहे. मृतदेहांमुळे नदीतील पाणी देखील प्रदूषित झालं आहे.
नदीचं पाणी दुषित होत असल्याने आम्ही मृतदेह नदीबाहेर काढून त्यावर अंत्यसंस्कार करत आहोत, असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशमधून अनेक मृतदेह गंगा नदीच्या माध्यमातून पश्चिम बंगालमध्ये येत आहेत. यामुळे नदीचं पाणी प्रदूषित झालं आहे. मालदा जिल्ह्यामध्ये नदीत सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आले आहेत. यापैकी काहींवर राज्य सरकारने अंत्यस्कार केले आहेत, असं ममता यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील नद्यांमध्ये अनेक मृतदेह तरंगताना दिसले होते. यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर आता पश्चिम बंगालमध्ये देखील येत असल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.