Top Newsआरोग्य

मुंबईत कोरोना नियंत्रणात, तरीही २७ जूनपर्यंत तिसऱ्या गटातील निर्बंध

मुंबई : मुंबईत कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत असला तरीही अद्याप पालिकेने शहरातील सगळे निर्बंध पूर्णपणे हटवलेले नाहीत. त्यामुळे कोरोना आकडेवारीनुसार मुंबईचा समावेश पहिल्या गटात होत असला तरीही शहरात तिसऱ्या गटातील निर्बंध २७ जूनपर्यंत कायम राहणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. त्याबाबत पालिकेने परिपत्रक प्रसिद्ध केले असून यामुळे मुंबईकरांना आणखी काही दिवस निर्बंधात राहावे लागणार आहे.

मुंबईतील चाचण्यांच्या तुलनेतील बाधितांचा दर ३.७९ टक्के आणि ऑक्सिजन खाटाव्याप्तीचा दर २३.५६ टक्के आहे. राज्य सरकारने लागू केलेल्या निकषांनुसार सध्या मुंबई पहिल्या गटात आहे. मात्र मुंबईतील लोकसंख्येची घनता, भौगोलिक रचना, महानगर क्षेत्रातून गर्दीतून येणारे प्रवासी आणि तिसऱ्या लाटेची भीती या पार्श्वभूमीवर २७ जूनपर्यंत मुंबईतील निर्बंध कायम ठेवण्याचे पालिकेने ठरविले आहे. सध्या शहरात तिसऱ्या टप्प्यांतील निर्बंध लागू राहाणार असून त्याबाबत २७ जूननंतरच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. तेव्हाच्या परिस्थितीनुसार निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी दिली. या कालावधीत सायंकाळी ५ वाजेपर्यंत जमावबंदी लागू राहाणार असून त्यानंतर संचारबंदी अंमलात येईल.

मुंबईत काय सुरू आणि काय बंद?

० अत्यावश्यक दुकाने- दररोज सकाळी ७ ते दुपारी ४
० इतर दुकाने- सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी ४ खुली राहातील. ही दुकाने शनिवारी व रविवारी बंद असतील.
० मॉल, थिएटर पूर्णपणे बंद राहातील.
० हॉटेल- सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ वाजेपर्यंत ५० टक्के खुली राहातील. त्यानंतर पार्सल सुविधा देता येईल. हॉटेल शनिवारी व रविवारी बंद राहातील.
० रेल्वेसेवा- सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद राहील.
० मॉर्निंग वॉक, मैदाने, सायकल चालविण्यासाठी पहाटे ५ ते सकाळी ९ पर्यंत मुभा.
० मनोरंजन कार्यक्रम- ५० टक्के आसनव्यवस्थेसह सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ पर्यंत.
० लग्नसोहळे- ५० टक्के क्षमतेने तर, अंत्यविधीत सहभागी होण्यासाठी २० व्यक्तींना मुभा.
० खासगी कार्यालये- ५० टक्के क्षमतेने दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहातील.
० सरकारी कार्यालये- ५० टक्के क्षमतेने सुरू राहातील.
० आऊटडोअर क्रीडा- पहाटे ५ ते सकाळी ९ आणि सायंकाळी ६ ते रात्री ९.
० स्टुडिओत चित्रीकरणास परवानगी.
० बांधकाम- दुपारी ४ वाजेपर्यंत मुभा
० कृषी- सर्व कामांना मुभा.
० ई कॉमर्ससाठी परवानगी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button