मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मुंबईत पुन्हा लॉकडाऊन जाहीर होण्याची भीती व्यक्त होत आहे. दररोजच्या चाचण्यांचे प्रमाण २३ हजारांपर्यंत वाढल्याने दैनंदिन रुग्ण नोंद वाढली आहे. मुंबईत स्थिती नियंत्रणात असल्यामुळे तूर्तास तरी लॉकडाऊन करण्यात येणार नाही. लोकलसह सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढत आहे. वारंवार सूचना करूनही लोक मास्क लावत नाहीत. त्यामुळे मुंबईकरांनी खबरदारीचे नियम न पाळल्यास तसेच यापुढेही रुग्णवाढ अशीच कायम राहिल्यास लॉकडाऊनसारखे कठोर निर्णय घेतले जाऊ शकतात, असा इशाराही पालिका प्रशासनाने दिला आहे.
मुंबईत गेल्या महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. दररोज एक हजाराहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. लग्न समारंभ, लोकल व सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गर्दीत कोरोना खबरदारीचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. रुग्णवाढ दिसत असली तरी चाचण्यांच्या प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत पाच टक्के घट आहे. त्यामुळे तूर्तास लॉकडाऊनची आवश्यकता नाही, असा पुनरुच्चार मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी केला आहे.