मुंबई : मुंबईत दुकानं तसेच हॉटेल्स रात्री १२ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. याविषयीची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. मुंबई वगळता इतर शहरातील दुकाने तसेच हॉटेल्संदर्भात स्थानिक प्रशासनाला योग्य तो निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
सध्याची कोरोना स्थिती तसेच निर्बंध या सर्व गोष्टींचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला. याच निर्णयांतर्गत आता मुंबईतील हॉटेल्स तसेच दुकाने रात्री १२ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच रात्री १ वाजेपर्यंत हॉटेल्सना शेवटची ऑर्डर घेता येईल असादेखील निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर रोजी एकही कोरोना रुग्ण दगावला नाही. तसेच सध्या मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. रात्री बारा वाजेपर्यंत दुकाने, हॉटेल्स तसेच रेस्टॉरंट्स सुरु ठेवण्याचा हा निर्णय फक्त मुंबई शहराच्या हद्दीपुरताच मर्यादित राहील. तर बाकीच्या जिल्ह्यांबाबात निर्णय घेण्याचे अधिकार तेथील स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. कोविडव्यतिरिक्त डेंग्यू, चिकनगुनिया यांच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ असून त्यांच्या उपचारांकडेदेखील पुरेसे लक्ष द्यावे अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच आपण हळूहळू निर्बंध शिथिल करीत असून रुग्ण संख्या कमी होताना दिसते. २२ ऑक्टोबरपासून आपण चित्रपटगृहे, नाट्यगृहे यांनाही सुरू करीत आहोत. उपाहारगृहे व दुकाने यांचीदेखील वेळा वाढवून देण्याची सातत्याने मागणी होत आहे. त्यामुळे त्यांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.