कोरोनाच्या स्थितीवर मात करण्यासाठी केंद्र आणि राज्यात समन्वय हवा : अजित पवार
पुणे : पुण्यात उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना कोरोनाची स्थिती हातळण्यासाठी केंद्रात आणि राज्यात समन्वय ठेवावा लागेल, असं अजित पवार म्हणाले. या बैठकीला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर हे देखील उपस्थित होते. केंद्राशी संबंधीत विषयांवर जावडेकरांशी चर्चा झाली, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
व्हेंटिलेटर बेड्स, ऑक्सिजन बेड्स, ऑक्सिजनचं नियोजन करावं लागेल. त्याबाबतचं नियोजन पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसंच जिल्हा परिषद करत आहे. पुणे, पिंपरी जम्बो हॉस्पिटल तातडीने सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. ससून हॉस्पिटलमध्ये ५०० बेड्स उपलब्ध होणार आहेत, असं देखील अजित पवार म्हणाले. कोरोनाशी लढाई करता येईल असं नियोजन आम्ही केलं आहे. तसंच पुणेकरांनी संचारबंदीचं चांगल्यारितीने पालन केलं, असं अजित पवार म्हणाले.