विराट कोहलीच्या पत्रकार परिषदेनंतर वादाला सुरुवात; बीसीसीआयने कोहलीचा दावा खोडून काढला !

नवी दिल्ली: भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या पत्रकार परिषदेनंतर नवीन वादाला सुरुवात झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने विराट कोहलीचा दावा खोडून काढला आहे. कर्णधारपदाच्या विषयावर बीसीसीआयकडून संवादाचा अभाव होता, कल्पना दिली नाही हा विराटचा दावा बीसीसीआयने फेटाळून लावला आहे. टी-२० कर्णधारपदाच्या एकूणच सर्व विषयावर विराट बरोबर चर्चा झाली होती. सप्टेंबर महिन्यात बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांनी विराट कोहलीशी चर्चा करुन त्याला टी-२- चे कर्णधारपद सोडू नको, अशी विनंती केली होती. बीसीसीआय पदाधिकाऱ्याने ही माहिती दिली.
बैठकीच्यादिवशी सकाळी चेतन शर्मा यांनी विराटला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाबाबतच्या निर्णयाची माहिती दिली होती, असे बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे. एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरुन हटवताना बीसीसीआयकडून संवादाचा अभाव होता असं कोहलीने आज पत्रकार परिषदेत सांगितलं. त्यावर आता बीसीसीआयने उत्तर दिलं आहे.
गांगुली काय म्हणाला होता?
मी विराट कोहलीला टी-२० संघाचे कर्णधारपद सोडू नको, असं सांगितलं होतं. विराटने मात्र आज वेगळचं सांगितलं. टी-२० चं कर्णधारपद सोडताना बीसीसीआयमधून कोणी आपल्याला अडवलं नाही. उलट हा निर्णय व्यवस्थित स्वीकारला असं सांगितलं. त्यामुळे नेमकं खरं कोण बोलतय, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
विराट कोहलीनं सौरव गांगुलीशी घेतला पंगा; दादाला ठरवलं खोटारडा !
भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली यानं दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पत्रकार परिषदेत अनेक गोष्टींचा खुलासा केला. विराटनं आजच्या पत्रकार परिषदेत वन डे मालिका खेळण्यास उपलब्ध असल्याचे स्पष्ट करताना रोहित शर्मासोबतच्या संबंधांवरही स्पष्ट मत मांडले. त्याचवेळी त्यानं ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्यावरही आपले मत मांडले. पण, ते मांडताना त्यानं थेट बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याच्याशी पंगा घेतला. त्यानं माजी कर्णधाराला खोटारडा ठरवलं.
रोहित शर्मासोबतच्या वादावर विराट म्हणाला, माझ्यात आणि रोहित याच्यात काहीच वाद नाही. मी हे अडीच वर्षांपासून सांगतोय आणि आता मी हे सांगून सांगून थकलो आहे. मी संघाची मान खाली करण्यासाठी काहीच असं करणार नाही. माझ्यात आणि रोहितमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही.
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यानं रोहितच्या वन डे संघाच्या कर्णधारपदावरील निवडीबाबत मौन सोडले. तो म्हणाला, बीसीसीआय आणि निवड समितीनं मिळून हा निर्णय घेतला आहे. खरं सांगायचं तर ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडू नकोस ही विनंती बीसीसीआयनं विराटला केली होती. पण, त्यानं तेव्हा नकार दिला. त्यानंतर ट्वेंटी-२० व वन डे संघासाठी दोन वेगवेगळे कर्णधार नसावेत, अशी निवड समितीची भूमिका होती. त्यामुळे हा निर्णय घेतला गेला.
गांगुलीनं ९ डिसेंबरला सांगितलं होतं की, विराट कोहलीला ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडू नकोस अशी विनंती मी केली होती आणि त्यानं ती नाही ऐकली.
त्यावर विराट आज म्हणाला, कसोटी संघ निवडण्याआधी निवड समितीची बैठक होण्यापूर्वी मला दीड तास आधी कॉल आला. निवड समिती प्रमुखांनी कसोटी संघाबाबत माझ्याशी चर्चा केली. तो कॉल संपण्यापूर्वी निवड समितीनं मला वन डे कर्णधारपदावर तू नसशील असे सांगितले आणि मी त्यांचा निर्णय मान्य केला. त्याआधी या विषयावर चर्चा झाली नाही. मला कोणीही ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडू नकोस, अशी विनंती केलेली नाही. बीसीसीआयकडून या निर्णयाबाबत माझ्याशी कुणीच चर्चा केली नाही . माझा निर्णय त्यांनी मान्य केला आणि हा काही गुन्हा नाही.




