मुंबई : काही तासांपूर्वी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेरील आंदोलनामागे षडयंत्र असल्याचा आरोप गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांनी केला आहे. कारण पोलिसांच्या हाती आणखी एक महत्वपूर्ण व्हीडिओ लागला आहे. त्या व्हीडिओतील व्यक्तीचा शोध सध्या पोलीस घेत आहेत, या प्रकरणात आणखी काही महत्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.
शालेय विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून केलेले आंदोलन हे योग्य नाही. महाराष्ट्रातील विद्यार्थी हुशार व अभ्यास करणारा आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्नांसाठी काही भूमिका मांडायची होती तर त्यांनी राज्य सरकारकडे मांडायला हवी होती, असे मत वळसे-पाटील यांनी मांडले. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर येण्यामागे एखादी शक्ती असावी अशी शंका व्यक्त करत जाणीवपूर्वक असे घडवून आणण्याचा प्रयत्न होत असल्याचे प्रतिपादन गृहमंत्र्यांनी केले.
याविषयी पोलीस विभागाला आदेश देण्यात आले असून मागील दोन दिवसांपासून या प्रकरणात सुरू असलेल्या सर्व गोष्टींचा तपास केला जाईल. हे कृत्य कोणत्या संघटनेकडून ठरवून करण्यात आले आहे का? याची शहानिशा करून, याचा पूर्णपणे छडा लावून योग्य ती कारवाई केली जाईल, असे गृहमंत्री म्हणाले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षणमंत्री योग्य मार्ग काढतील. विद्यार्थ्यांच्या हिताची काळजी सरकारला आहे. यामध्ये सरकार निश्चितपणे मदत करण्याची भूमिका घेईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. काही तासांपूर्वी या आंदोलनामुले मोठा तणाव निर्माण झाल्याचे दिसून आले. यावेळी आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीमारही करण्यात आला आहे.
हिंदुस्तानी भाऊची वकिलाकडे धाव
या प्रकरणात ज्या हिंदुस्तानी भाऊमुळे आंदोलन पेटलं असा आरोप होत आहे, त्या हिंदुस्तानी भाऊच्या अटकेची शक्यता निर्माण झाली आहे. पोलीस त्याच्यावर गुन्हा दाखल करणार आहेत. त्यामुळे त्यांनी वकिलाकडे धाव घेतल्याची माहिती समोर आली आहे. हिंदुस्तानी भाऊने वकिलांकडे अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. धारावीत झालेलं आंदोलन हिंदूस्तानी भाऊच्या सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टनंतर झालंय, असा आरोप करण्यात येत आहे.
‘हिंदुस्तानी भाऊ’नेच दिला होता विद्यार्थ्यांना शिक्षणमत्र्यांच्या घराचा पत्ता
धक्कादायक म्हणजे, वर्षा गायकवाड यांच्या घराचा पत्ता हा हिंदुस्तानी भाऊ अर्थात विकास पाठकने दिल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. सोशल मीडियावर हिंदुस्तानी भाऊ म्हणून प्रसिद्ध असलेल्या विकास पाठक हाच या विद्यार्थ्यांच्या हुल्लडबाजी मागे असल्याचे आता समोर आला आहे. विकास पाठक यानेच ३० जानेवारी रोजी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये त्याने आपल्या चाहत्यांना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराचा पत्ता सांगितला. एवढंच नाहीतर वेळ आणि किती वाजेपर्यंत आंदोलन करायचे याची सूचना सुद्धा केली होती.
जर ऑफिसेस ऑनलाइन सुरू आहेत, तर मग विद्यार्थ्यांशी का जीवाशी खेळ केला जात आहे. देशातील जेवढे शिक्षणमंत्री आहे, त्यांच्या घरासमोर आंदोलन करायचे आहे. आपलं कुणाच्याविरोधात भांडण नाही, कुणालाही त्रास नाही फक्त कोरोनाची लाट ओसरत नाही तोपर्यंत परीक्षा रद्द करा, अशी मागणीच या भाऊने केली आहे.