Top Newsराजकारण

निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसचे चिंतन; मोठ्या बदलाचे संकेत

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा निर्णय स्थगित

नवी दिल्ली : काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नुकत्याच पाच राज्यांमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीवर चिंता व्यक्त केली. सोनिया गांधी म्हणाल्या, निवडणुकीचे निकाल पाहिल्यानंतर हे स्पष्ट झालं आहे, की पक्षात बदल करणं आवश्यक आहे. त्या म्हणाल्या, की आपण या गंभीर धक्क्याची दखल घेणं गरजेचं आहे. निवडणुकीचे निकाल पाहिल्यानंतर मला वाटलं, की आता आपण प्रत्येक गोष्टीवर विचार करण्याची गरज आहे, असंही त्या म्हणाल्या.

सोनिया गांधी सभेत म्हणाल्या की, कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी मोदी सरकार अपयशी ठरलं आहे. अशा नाजूक वेळी त्यांनी पुन्हा एकदा सर्वपक्षीय बैठक बोलविण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. कोरोनाला एक मोठं आरोग्य संकट म्हणून संबोधित करताना सोनिया गांधी यांनी सर्व कार्यकर्त्यांना लोकांच्या मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन केलं.

सोनिया गांधी यांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या अपयशाचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करण्याविषयी निर्णय घेतला आहे. आसाम आणि केरळमधील पराभव तसंच पश्चिम बंगालमध्ये पक्षाला मिळालेल्या शून्य जागा अत्यंत निराशाजनक असल्याचं त्यांनी म्हटलं. जूनअखेरीस होणाऱ्या काँग्रेस अध्यक्षाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळापत्रक तयार करण्याबाबतची माहितीही त्यांनी दिली. सोनिया गांधी, मनमोहन सिंग, राहुल गांधी, प्रियंका गांधी, गुलाम नबी आझाद, पी चिदंबरम, आनंद शर्मा यांच्यासह सीडब्ल्यूसीचे इतर सदस्य या बैठकीला हजर होते.

नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्य आणि केंद्र शासित प्रदेशाच्या निवडणूकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. आसाम आणि केरळमध्ये सत्तेत परतण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसला मोठी हार पत्कारावी लागली आहे. पश्चिम बंगालमध्ये आपलं खातं खोलणंही काँग्रेसला शक्य झालं नाही. पुद्दुचेरीमध्ये गेल्या काही महिन्यांपर्यंत सत्तेत असतानाही काँग्रेसला आपली जागा टिकवता आली नाही. तमिळनाडूमध्ये काँग्रेससाठी दिलासादायक बाब म्हणजे द्रमुकसोबतच्या त्यांच्या गठबंधनाला विजय मिळाला आहे.

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा निर्णय स्थगित

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वी बैठकीत २३ जूनला निवडणूक होईल असं जाहीर करण्यात आलं होतं. तसेच अर्ज भरण्याची शेवटची तारीख ७ जून असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र करोनाचं कारण देत पुन्हा एकदा निवडणूक टाळण्यात आली आहे. तारीख जाहीर झाल्याच्या अवघ्या काही तासातच निर्णय बदलण्यात आला आहे. अध्यक्षपदाची निवडणूक तिसऱ्यांदा टाळण्यात आली आहे. त्यामुळे पुढची तारीख जाहीर होईपर्यंत सोनिया गांधी यांच्याकडे हंगामी अध्यक्षपद राहाणार आहे.

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवासाठी राहुल गांधी यांच्यावर बोट दाखवण्यात आलं होतं. त्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. यामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे. दरम्यान राहुल गांधी यांचं मन वळवण्याचे अनेकांचे प्रयत्न अपयशी ठरले. त्यामुळे नवा अध्यक्ष मिळेपर्यंत हंगामी अध्यक्षपद सोनिया गांधी यांच्याकडे देण्यात आलं आहे. राहुल गांधी १६ डिसेंबर २०१७ ते १० ऑगस्ट २०१९ या कालावधीत काँग्रेसचे अध्यक्ष होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button