नवी दिल्ली : विधानसभा अध्यक्षपदावरून काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद असल्याचं उघड झालं आहे. महाविकास आघाडी सरकारची स्थापना झाल्यानंतर नाना पटोले यांना विधानसभा अध्यक्षपद देण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर काही काळातच नाना पटोले यांच्यावर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हापासून आतापर्यंत हे पद रिक्त आहे.
विधानसभा अध्यक्ष हे पद महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला आले होते. परंतु नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर पुन्हा एकदा या पदावरून महाविकास आघाडीत पेच निर्माण झाला होता. विधानसभा अध्यक्षपदावरून महाविकास आघाडीत चर्चा होईल मग निर्णय होईल असं राष्ट्रवादी-शिवसेना म्हणत होती. तर हे पद काँग्रेसकडेच राहणार असल्याचा दावा काँग्रेसचे नेते करत आहेत. परंतु अद्याप विधानसभा अध्यक्षपदाबाबत संभ्रम आहे.
त्यातच आता काँग्रेस विधानसभा अध्यक्षपदावरून पक्षात मतभेद झाल्याचं कळतंय. यासाठी ज्येष्ठ मंत्री बाळासाहेब थोरात आणि मंत्री नितीन राऊत दिल्लीत दाखल झाले आहेत. विधानसभा अध्यक्षपद अद्यापही काँग्रेसला मिळालं नाही. या अधिवेशनातही विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांमध्ये नाराजी आहे. यासाठी थोरात, राऊत हे दिल्लीत काँग्रेस हायकमांड आणि राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. त्याचसोबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचीही भेट घेणार आहेत.
विधानसभा अध्यक्षपदावरून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवलं होतं. त्यानंतर अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात येईल अशी चर्चा सुरू झाली होती. महाविकास आघाडीत सुसंवाद आहे. सत्तेतील व्य़क्तींची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसच्या वाट्याला गेले आहे. त्यामुळे पुढचा अध्यक्ष त्यांचाच असेल. महाविकास आघाडीचाच उमेदवार विजयी होईल. विरोधकांनी ही निवडणूक नाही लढविली तर महाराष्ट्रावर उपकार होतील असं शिवसेना नेते संजय राऊतांनी म्हटलं होतं. तर ५ जुलै रोजी विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेस उमेदवाराची घोषणा केली जाईल असं प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सांगितले होते. मात्र या विधिमंडळ अधिवेशनातही अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली नाही.
नितीन राऊत-नाना पटोले वाद
बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत पक्षांतर्गत मतभेदावरून राहुल यांची भेट घेणार आहेत. खास करून पटोले आणि राऊत यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू आहे. त्याची तक्रार राहुल यांच्याकडे केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे, असं सूत्रांनी सांगितलं.
नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खनिकर्म महामंडळाबाबत एक पत्र लिहिलं होतं. त्यात नागपूर खनिकर्म महामंडळाकडून कोळसा पुरवठा आणि कोळसा वॉशिंगचे काम करण्यासाठी निविदा प्रक्रिया काढण्यात आली होती. यात नियमबाह्य प्रक्रिया झाली असून हे प्रकरण आर्थिक घोटाळ्याशी संबंधित आहे, त्यामुळे त्याची चौकशी करण्याची मागणी पटोले यांनी केली होती. विशेष म्हणजे हे प्रकरण राऊत यांच्या ऊर्जा खात्याशी संबंधित असल्याचं सांगितलं जात होतं. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यावर राऊत यांनी प्रतिक्रिया दिली होती. हे पत्रं ज्या विभागाला लिहिलं त्याने खुशाल चौकशी करावी, असं राऊत यांनी म्हटलं होतं. आमदार होण्यापूर्वी माझा कोळश्याचा व्यवसाय होता. पण हे पत्र माझ्याशी संबंधित नाही, असं राऊत म्हणाले होते. त्यामुळे राऊत-पटोले यांच्यात सुप्त संघर्ष सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.
नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्षपदाची ऑफर आली होती. तेव्हा त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाबरोबरच मंत्रीपदाची हायकमांडकडे मागणी केली होती. त्यातही त्यांनी ऊर्जा विभाग मिळण्याचे सूतोवाच केलं होतं. त्यावर नितीन राऊत नाराज झाले होते. आपलं पद जाऊ नये म्हणून राऊत यांनी दिल्लीवारीही केली होती.