Top Newsराजकारण

काँग्रेसची वैचारिक परंपरा संपुष्टात येतेय : सुशीलकुमार शिंदे

इंदापूर: सध्याच्या काळात काँग्रेसची वैचारिक परंपरा लयाला जात आहे. एकेकाळी पक्षात माझ्या शब्दाला किंमत होती. पण आता ती राहिली आहे का माहिती नाही, अशी खंत माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली. ते मंगळवारी इंदापूर येथील कार्यक्रमात बोलत होते.

काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमासाठी आज माजी केंद्रीय गृहमंत्री,माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आज इंदापूर मध्ये आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या व्यासपीठावर भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे देखील उपस्थित होते.यावेळी सुशीलकुमार यांनी पक्षाच्या सद्यस्थितीविषयी खंत व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. १९७४-७५ च्या काळात काँग्रेसची वैचारिक शिबीरे भरवली जात होती. त्यामध्ये चुकीच्या धोरणांमध्ये सुधारणा केली जात असे. मात्र, सध्या तसे घडताना दिसत नाही. आम्ही नक्की कुठे आहोत, हे पाहणे अवघड झाले आहे. काँग्रेसची ही वैचारिक परंपरा संपत चालल्याची खंत सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली. तसेच आपल्या शब्दाला पक्षात पूर्वीइतकी किंमत उरली आहे किंवा नाही, अशी साशंकताही त्यांनी बोलून दाखविली. त्यांच्या या वक्तव्याचे आता कशाप्रकारे राजकीय पडसाद उमटणार, हे पाहावे लागेल.

गेल्या काही दिवसांपासून राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसमध्ये अनेक अंतर्गत घडामोडी सुरु आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांचा विरोध आहे. पक्षातील २३ ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल करण्याची गरज व्यक्त केली होती. तर दुसरीकडे राज्य पातळीवर महाविकासआघाडी सरकारमध्ये असलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाची भाषा सुरु केली आहे. त्यामुळे महाविकासआघाडी सरकार अस्थिर होण्याची चिन्हे दिसत आहेत. सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्याचा रोख नक्की कोणत्या दिशेने होता, याविषयी सध्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button