महाराष्ट्रात काँग्रेसची स्वबळाची तयारी, पण अंतिम निर्णय संसदीय समितीचा : एच. के. पाटील
![](https://dg24.in/wp-content/uploads/2021/06/h.k.-patil.jpg)
नवी दिल्ली : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर, ते महत्त्वाच्या बैठकीसाठी तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. महाराष्ट्रातील नियोजित दौरा अर्धवट सोडून ते दिल्लीत दाखल झाले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना, पटोलेंनी स्वबळाची घोषणा केली आहे. त्यामुळे त्यांच्या या दिल्ली दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांची स्वबळावर तयारी सुरु केली आहे, मात्र विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या आघाडीचा निर्णय हा पार्लमेंटरी कमिटीत घेऊ”, असं पाटील म्हणाले.
एच. के. पाटील म्हणाले, नाना पटोले हे संघटनात्मक बैठकीसाठी दिल्लीत आले आहेत. महाराष्ट्रातील सरकार धोक्यात नाही. सरकार चांगले काम करत आहे. कॉंग्रेसचे समर्थन कायम राहील आणि सरकार पाच वर्ष टिकणार आहे. हिडन ऑपरेशन लोटसबद्दल मला माहिती नाही, मात्र आम्ही तीन पक्ष सोबत आहोत, त्यामुळे हे हिडन लोटस ऑपरेशन महाराष्ट्रात चालणार नाही, असं पाटील यांनी नमूद केलं.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे नियोजित उत्तर महाराष्ट्र दौरा सोडून दिल्लीला रवाना झाले. नाना पटोले यांनी केलेली स्वबळाची भाषा, महाविकास आघाडीतील कुरबुरी या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांचा दिल्ली दौरा महत्त्वाचा आहे. या दौऱ्यात नाना पटोले हे पक्षश्रेष्ठी सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. आगामी काळातील निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार, हा शब्द आम्ही दिला आहे, त्यात कुठल्याही परिस्थितीत माघार नाही, निवडणुकांना अजून तीन वर्षे बाकी आहेत, अशा परिस्थितीत पक्ष संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गैर नाही, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुनरुच्चार केला होता.