काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव (अण्णा ) यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. गेल्या काही दिवसापासून त्यांच्यावर हैदराबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. रुग्णालयात उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव दुपारी १ वाजेपर्यंत कोल्हापुरात आणण्यात येणार असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली.
चंद्रकांत जाधव हे २०१९ मध्ये झालेल्या विधान सभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकटावर निवडणूक जिंकले होते. शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचा त्यांनी पराभव केला होता. एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांनी कोल्हापूरच्या उद्योग जगतात नावालौकिक मिळवला होता. पूर्वाश्रमीचे फुटबॉल खेळाडू, फुटबॉलखेळाचा पाठीराखा म्हणून त्यांची जिल्ह्याला ओळख होती. आपल्या दोन-अडीच वर्षाच्या आमदारकीच्या काळात कोल्हापूर शहराच्या तसेच उदयोजकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी स्वत:ला झोकून दिले होते. साधी राहणी आणि लोकांमध्ये मिसळण्याच्या स्वभावामुळे ते लोकप्रिय होते. त्यांच्या निधनाने मतदारसंघातील नागरिकांवर शोककळा पसरली आहे.