राजकारण

नाना पटोले, भाई जगताप यांच्यावर काँग्रेसचे मंत्री नाराज; प्रभारींकडे तक्रार

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांच्याविषयी काँग्रेसच्या मंत्र्यांनी महाराष्ट्राचे प्रभारी एच.के. पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे. पटोले यांनी आपल्याला मुख्यमंत्री व्हायला आवडेल, असे केलेले विधानही अनेक ज्येष्ठ नेत्यांना आवडलेले नाही.

महाराष्ट्रात काँग्रेस चौथ्या स्थानावर असूनही सत्तेत आहे. अशावेळी सत्ता टिकवायची सोडून स्वबळाची भाषा करणे पक्षाचा आत्मघात करून घेणे आहे. उद्या शिवसेना भाजपसोबत गेली व त्यांचे सरकार आले, तर काँग्रेसचे उरलेसुरले आमदारही पुढच्या वेळी निवडून येणार नाहीत. याची जाणीव न ठेवता अशी विधाने करण्याने पक्षाचे नुकसान होईल, असेही काही ज्येष्ठ मंत्र्यांनी प्रभारी पाटील यांना सांगितले.

मुंबई काँग्रेसमध्ये अध्यक्ष भाई जगताप आणि आमदार, पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे सूर आहेत. जाहीरनामा समितीचे अध्यक्ष सुरेश शेट्टी यांनी प्रभारी पाटील यांना भेटून आपल्याला पदावरून दूर करा, असे सांगितले आहे. आ. झिशान सिद्दीकी यांनी थेट दिल्लीपर्यंत तक्रारी केल्या आहेत. विविध महामंडळांच्या नेमणुका रखडलेल्या आहेत. त्यासाठी प्रयत्न करायचे सोडून, नुसत्या स्वबळाच्या भाषेने काय साध्य होईल? असा सवालही काही मंत्र्यांनी केला आहे.

नाना पटोले आणि भाई जगताप यांना स्वबळाची भाषा आवरायला सांगा. हे सरकार पाच वर्षे चालवायचे आहे, अशा शब्दांत काँग्रेसच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी पक्षाचे प्रभारी एच.के. पाटील यांच्याकडे दोन्ही नेत्यांसमोर तक्रारी केल्या. अखेर पाटील यांना स्वबळाचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असे बोलायला मंत्र्यांनी भाग पाडले.

ज्या मतदारसंघात शिवसेनेचे आमदार, काँग्रेसचा पराभव करून निवडून आले, तेथे काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. त्यातूनच स्वबळाची भाषा सुरू झाली. काँग्रेसने नसीम खान आणि सुरेश शेट्टी यांना कार्यकारिणीवर घेतले. या दोघांचाही पराभव त्यांच्या मतदारसंघात शिवसेना उमेदवारांनी केला. त्यामुळे सातत्याने नसीम खानही स्वबळाची भाषा करत आहेत.

काँग्रेसमधील ही सुंदोपसुंदी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नजरेत आहे. त्या दोन्ही पक्षांकडून काँग्रेसमधील नाराजांची चाचपणी सुरू असल्याचे समजते. काँग्रेसमध्ये वरिष्ठ नेत्यांचा एकमेकांशी संवाद उरलेला नाही. त्याचा फायदा अन्य तीन पक्षांकडून भविष्यात घेतला गेल्यास आश्चर्य वाटणार नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना वर्धापन दिनाच्या निमित्ताने, राज्यात परिस्थिती काय आहे, लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. आर्थिक संकट आहे. कुठल्याही निवडणुका समोर नाहीत. अशावेळी स्वबळाची भाषा करू लागलो, तर लोक जोड्याने मारतील, असे म्हणत जाहीरपणे स्वतःची नाराजी नोंदवली आहे. काँग्रेसचे एक मंत्री म्हणाले, ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप या तिन्ही पक्षांना योग्य शब्दांत जाणीव करून दिली आहे. शिवाय त्यांनी जनतेच्या मनातही स्वतःची चांगली प्रतिमाही केली. ही बाब काँग्रेस नेतृत्वाला कधी कळणार असा सवाल एका मंत्र्याने उपस्थित केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button