पणजी: काँग्रेसचे पणजीची उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेले माजी महापौर उदय मडकईकर यांनी उत्पल पर्रिकर यांना निवडणुकीत आपला पाठिंबा जाहीर केला आहे. कार्यकर्त्यांसोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी याविषयीची अधिकृत घोषणा केली.
उत्पल पर्रिकर हे पणजीची निवडणूक अपक्ष लढवणार आहेत. त्यामुळे मतांचे विभाजन होऊ नये, यासाठीच उत्पल यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. उत्पल यांना पाठिंबा देतानाच त्यांच्यासोबत प्रचारातसुद्धा सहभागी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मडकईकर म्हणाले की, उत्पल यांना निवडणुकीत पाठिंबा द्यावा की तृणमूल काँग्रेसची ऑफर स्वीकारून त्यांच्या उमेदवारीवरून निवडणूक लढवावी, असा प्रश्न माझ्यासमोर निर्माण झाला होता. मात्र, त्यापैकी उत्पल यांना पाठिंबा देण्याचा निर्णय कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून घेतला आहे. भाजपच्या उमेदवाराचा पराभव करणे हा उद्देश ठेवूनच उत्पल यांना पाठिंबा दर्शवला आहे. जर मी अपक्ष किंवा अन्य पक्षांतर्फे निवडणूक लढवली, तर मतांचे विभाजन होईल, जे अयोग्य ठरणार आहे. भाजप उमेदवार बाबूश मोन्सेरात यांना निवडणुकीत केवळ उत्पलच टक्कर देऊ शकतात. ते नक्कीच विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तृणमूल काँग्रेसने पक्षात येण्यासाठी चांगली ऑफर दिली होती. टीएमसीचे उपाध्यक्ष तथा माजी आमदार लुईझिन फालेरो यांनी तशी आपल्याशी चर्चासुद्धा केली होती. तर दुसरीकडे पक्षाचे नेते प्रशांत किशोर यांनी आपल्याला निवडणुकीत जिंकून आणू अशी हमीसुद्धा दिली. मात्र, माझ्या तृणमूल प्रवेशाला अनेक कार्यकर्त्यांनी विरोध केला. त्यामुळे मी ही ऑफर स्वीकारली नाही, असे मडकईकर यांनी सांगितले.
दरम्यान, उत्पल पर्रिकर यांनी माजी महापौर तथा विद्यामान नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. फुर्तादो हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून, तेसुद्धा काँग्रेसतर्फे पणजीतून निवडणूक लढवण्यास इच्छूक होते. उत्पल यांनी त्यांच्याकडेही पाठिंब्याची मागणी केली आहे.
बाबूश-एल्विस यांची सेटिंग
बाबूश मोन्सेरात यांच्यासोबत सेटिंग करूनच काँग्रेसने एल्विस गोम्स यांना पणजीची उमेदवारी दिली आहे. याचा पुन्हा एकदा मी पुनरुच्चार करीत आहे, असे मडकईकर म्हणाले. उत्पल यांच्यावर उमेदवारीबाबत अन्याय झाल्यानेच त्यांनी पक्षाचा राजीनामा देऊन अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर ते पुन्हा भाजपमध्ये जाणार नाही, यावर आपला विश्वास आहे. त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवूनच पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप पक्ष बाबूश मोन्सेरात यांनी विकत घेतला आहे, असा आरोप मडकईकर यांनी केला.
टोनींची साथ सोडणार नाही
पणजीची उमेदवारी न दिल्याने आपण काँग्रेसवर नाराज झालो असो तरी टोनी रॉड्रिग्स यांना माझा पाठिंबा आहे. त्यांच्या प्रचारातसुद्धा मी सहभागी होईन. टोनी माझे मित्र असून, शेवटच्या क्षणी मी त्यांची साथ सोडणार नाही. माझा घात काँग्रेसने नाही, तर काँग्रेस नेत्यांनी केला आहे, असे उदय मडकईकर यांनी स्पष्ट केले.
माझ्याविरोधात कोण आहे त्याचा फरक पडत नाही : बाबूश मोन्सेरात
मला विराेधकांंची पर्वा नाही. माझ्याविरोधात कोण निवडणूक लढवत आहे, याचा मला फरक पडत नाही. लोकांंच्या सेवेसाठी मी नेहमीच काम सुरुच ठेवणार आहे, असे पणजीचे भाजप उमेदवार बाबूश मोन्सेरात यांंनी स्पष्ट केले.
पणजी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार बाबूश मोन्सेरात प्रचार करीत आहेत. बॉक द व्हाक परिसराला भेट दिली. माजी आमदार सिद्धार्थ कुंंकळ्येकर यांंच्या घरी त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांंनी कुंकळ्येकर यांच्याकडे पाठिंंब्याचे आवाहन केले. मोन्सेरात म्हणाले, गेल्या २० वर्षांपासून मी जनतेची सेवा करीत आहे. त्यामुळे लोक मला निवडणुकीत जिंंकून आणतील, याची आपल्याला खात्री आहे.
मोन्सेरात म्हणाले, केवळ निवडणुका जवळ येताच मी माझ्या मतदारांंची भेट घेत नाही तर मी नेहमीच माझ्या मतदारांंच्या संंपर्कात असतो. या काळात त्यांंच्या समस्या मी जाणून घेतो. मी इतकी वर्षे सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात कार्यरत असल्याने मी नक्की कसा आहे हे जनतेला ठाऊक आहे. जनतेचा माझ्यावर विश्वास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांंच्यासोबत पणजी महानगरपालिकेच्या नगरसेवक दीक्षा माईणकर तसेच भाजपचे कार्यकर्ते हजर होते.
भाजप नेत्यांकडून सुडाचे राजकारण; मायकल लोबोंचा आरोप
भाजप नेते नेहमी सुडाचे राजकारण करतात. त्यामुळे मी राजीनामा देण्याबाबत शेवटपर्यंत थांबलो, असे माजी मंत्री मायकल लोबो यांनी स्पष्ट केले. लोबो म्हणाले की, भाजपच्या तिकिटावर न लढण्याचा निर्णय मी सहा महिन्यांपूर्वीच घेतला होता. तसेच पत्नी डिलायला हिच्यासाठी मी भाजपकडे कधीही तिकीट मागितले नव्हते. पक्षाला सोडचिठ्ठी देण्याबाबत मी अखेरपर्यंत थांबलो. कारण आधीच राजीनामा दिला असता तर भाजपच्या नेत्यांनी माझ्याबाबतीत सुडाचे राजकारण केले असते.
लोबो पुढे म्हणाले की, भाजपमध्ये सध्या मुख्यमंत्री तसेच पक्षाचे आयोजन सचिव धार्मिक पातळीवर फूट पाडण्याचे काम करीत आहेत. मुख्यमंत्री कदाचित पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांना खूश करण्यासाठी हे करीत असावेत. लोबो म्हणाले की, कळंगुट, कांदोळीपट्ट्यातील लोकांचा नेहमीच काँग्रेसकडे कल राहिलेला आहे. २०१२ आणि २०१७ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये मी भाजपच्या तिकिटावर निवडून आलो. लोकांनी काम पाहिलेले आहे. नेहमीच स्थानिक व्यावसायिकांना मी हात दिला. भाजपमध्ये सध्या कोणतेच ताळतंत्र राहिलेले नाही आणि निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय केला जात आहे. भाजप नेते ज्या पद्धतीने वागायला लागले आहेत, ते पाहता आजवर ज्यांनी पक्ष मोठा करण्यासाठी घाम गाळला, त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे दिसून येत आहे. त्यांना बाजूला काढले जात आहे, असेच आजवर दिसून आले आहे. त्यामुळे मूळ कार्यकर्ते पक्षापासून बाजूला गेल्याचे दिसते.
लोबो म्हणाले, दिवंगत मनोहर पर्रिकर यांच्या तत्त्वांना हे नेते हरताळ फासत आहेत. पर्रिकर यांचे पुत्र उत्पल यांनाही हीन वागणूक दिली गेली. पक्ष सोडण्याचा निर्णय मी सहा महिन्यांपूर्वी घेतला होता. कारण भाजपकडे आता पर्रीकरांची तत्त्वे राहिलेली नाहीत. ते हयात असताना वेगळा अजेंडा होता. आताच्या नेत्यांचा अजेंडा वेगळा आहे. सुडाचे राजकारण करण्याची भाजपची नीती देशभर लोकांना ठावुक आहे. त्यामुळे पक्षाची आजची अवस्था झाली आहे.
माजी मंत्री लोबो म्हणाले की, काँग्रेसमध्ये तशी नवी सुरुवात असली तरी मी स्थिरावलो आहे. मुख्यमंत्रिपदासाठी जे नेहमीच शर्यतीत असायचे, ते आता पक्षात राहिलेले नाहीत.