राजकारण

विधानसभा अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव निश्चित? निवडणूक लांबणार?

मुंबई : काँग्रेसमधील विधानसभा अध्यक्षपदाचा पेच अखेर सुटला आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव नक्की झाल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. उद्या चव्हाण विधानसभा अध्यक्षपदासाठीचा अर्जही भरणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

राज्य सरकारने विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार उद्या २७ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरायचा असून २८ डिसेंबर रोजी अध्यक्षांची निवड होणार आहे. विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसच्या वाट्याला आलेलं आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षपद कुणाकडे देणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. काँग्रेसमधून एकाचवेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, यात पृथ्वीराज चव्हाणांचं नाव या पदासाठी फिक्स झाल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलं.

दरम्यान, राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटाला अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने पूर्णवेळ अध्यक्ष पदासाठी कोणाची निवड होणार याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागून आहे. मात्र ही प्रतिक्षा लवकरचं संपणार आहे. कारण राज्य सरकारच एक शिष्टमंडळ आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला गेले होते. या भेटीनंतर राज्यपाल विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी मान्यता देतील याची खात्री असल्याची प्रतिक्रिया राज्याचे महसूल मंत्री, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. नगरविकास मंत्री, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आज राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर पोहचले होते.

भेटीसंदर्भात बोलताना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडीचा कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिफारसीनुसार राज्यपालांना दिला आहे. त्यामुळे राज्यपालांनी ही शिफारस मान्य करावी याची विनंती करण्यासाठी छगन भुजबळ, एकनाथ शिंदे आम्ही गेलो होतो. त्यांना हा कार्यक्रम जाहीर करण्याची मान्यता द्यावी अशी विनंती केली आहे.

निवड कार्यक्रम बदलाबद्दल फार काही विचारणा केलेली नाही. बदल केलेत ते लोकसभेत जी पद्धत तीच पद्धत महाराष्ट्र विधानसभेकरिता केलेली आहे. विधान परिषदही त्याच पद्धतीने आहे. त्यामुळे चुकीचं काही केलं असं नाही. त्यांना फक्त काही अभ्यास करायचा आहे माहिती घ्यायची आहे ती घेऊन राज्यपाल कळवतो असं म्हटले आहेत. १२ आमदारांच्या निवडीबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. मात्र राज्यपाल विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडीची काही माहिती घेऊन मान्यता देतील अशी खात्री आहे. काही अडचण नाही निश्चित मान्यता देतील, बिगर अध्यक्षाचं कसं विधानसभा ठेऊ शकतात. ही फार अवघड प्रोसेस नाही एका फोनवर आम्हाला नाव समजेल आणि आम्ही नॉमिनेशन करु.

यावर मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यपालांनी विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक घेण्याचे पत्र दिले होते. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठवलेले पत्र आम्ही राज्यपालांना दिले आहे. ही निवडणूक उद्याच्या दोन दिवसांत व्हावी कारण विधानसभेला कायम अध्यक्ष असणं आवश्यक आहे. त्यादृष्टीने नियमानुसार आम्ही राज्यपालांना ही मागणी केलेली आहे. य़ावर राज्यपालांनी देखील सकारात्मक भूमिका दर्शवली, त्यांनी एवढचं म्हटलं की, याबाबतीत कायदेशीर चर्चा करुन यावर उद्या निर्णय कळवतो त्यामुळे निर्णयाची अपेक्षा आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्म इंदोरचा. कऱ्हाडच्या नगरपालिकेच्या शाळेत त्यांचं सातवीपर्यंत शिक्षण झालं. त्यानंतर राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी कराडच्या ज्या टिळक हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलं. त्याच शाळेत इयत्ता आठवीला प्रवेश घेतला. त्यानंतर पुढील शिक्षण दिल्लीत झालं. त्यांनी राजस्थानच्या बीआयटीस पिलानीमधून बीई-ऑनर्सची पदवी घेतली. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते अमेरिकेला गेले. बर्कलेमधील कॅलिफोर्निया विद्यापीठातून त्यांनी एमएसची पदवी घेतली. त्यानंतर एअरोनॉटिकल क्षेत्रात त्यांनी काही काळ नोकरीही केली. पृथ्वीराज चव्हाण यांना घरातूनच राजकारणाचा वारसा मिळाला होता. त्याचे वडील आनंदराव चव्हाण आणि आई प्रेमलाताई चव्हाण हे दोघेही काँग्रेसचे खंदे समर्थक होते. त्यामुळे त्यांना लहानपणापासूनच राजकारणाचं बाळकडू घरातून मिळालं. त्यांचे वडील इंदोरच्या होळकर संस्थानमध्ये कायदा सल्लागार होते. ते जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळातही होते.

१९९१-९५, १९९५-९८ या काळात ते लोकसभेचे सदस्य होते. ते कराड लोकसभा मतदारसंघातून तीनदा विजयी झाले आहेत. त्यांना सायन्स व टेक्नॉलॉजीच्या मंत्रालयाचे सल्लागार समितीचे सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर १९९२-९३ मध्ये ते इलेक्ट्रॉनिक अ‍ॅटोमिक एनर्जी मंत्रालयाचे सल्लागार सदस्य होते. १९९४-९६ मध्ये त्यांनी विज्ञान, माहिती व तंत्रज्ञान, पर्यावरण आणि वन खात्याच्या मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य म्हणूनही काम पाहिलं. १९९८-९९ मध्ये ते राज्यसभेवर निवडून गेले. त्यानंतर २००२ मध्ये त्यांची पुन्हा राज्यसभा सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांनी अर्थ नियोजन समितीचे सल्लागार सदस्य, संरक्षण मंत्रालयाच्या समितीचे सल्लागार सदस्य म्हणून काम पाहिले होते. २०००-०१ मध्ये ते काँग्रेसचे प्रवक्तेही होते. त्यानंतर २००४ ते २००९ पर्यंत ते पंतप्रधान कार्यालयात राज्यमंत्री होते.

पृथ्वीराज चव्हाण यांनी ११ नोव्हेंबर २०१० रोजी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर २८ एप्रिल २०११ रोजी ते विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आले. चार वर्षे ते मुख्यमंत्रीपदी होते. २६ सप्टेंबर २०१४ मध्ये त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लांबणार?

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची कार्यक्रम पत्रिका राज्यपाल यांच्या सहीसाठी पाठवण्यात आली असून सही करण्याची विनंती केली आहे. पण, राज्यपालांनी थोडा अभ्यास करण्यासाठी वेळ मागितला आहे. त्यामुळे राज्यपालांच्या निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून राज्यपाल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातला संघर्ष सर्वश्रुत आहे. आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजभवनाची पायरी चढली आहे.

राज्यपालांना कार्यक्रम पत्रिका देण्यात आली होती, पण अद्याप राज्यपालांनी सही न केल्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांना संशय बळावला. राज्यपालांची सही गरजेची असते. परंतु, आधीच्या वादाची पार्श्वभूमी पाहता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन निवडणुकीच्या कार्यक्रम पत्रिकेवर सही करण्याची विनंती केली. पण, राज्यपालाने अद्याप कोणताच निर्णय न घेतल्यामुळे निवडणुकीचा कार्यक्रम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button