काँग्रेस नेते आ. शरद रणपिसे यांचे निधन
पुणे : काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार शरद रणपिसे यांचे गुरुवारी दुपारी ह्रदयविकाराने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. ह्रदयविकाराचा त्रास झाल्याने त्यांना पंधरा दिवसांपूर्वी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठे बंधू राजू तसेच अन्य परिवार आहे. स्वतः शरद रणपिसे अविवाहीत होते.
पर्वती विधानसभा मतदार संघातून रणपिसे दोन वेळा (१९८५ ते १९९० व १९९० ते १९९५) काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. त्याआधी ते पुणे महापालिकेत (१९८० ते १९८५) नगरसेवक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर पक्षाने त्यांना विधानपरिषदेवर तीन वेळा संधी दिली. सध्या ते काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते होते. अतीशय ऋजू स्वभावाचे नेते म्हणून रणपिसे सर्व पक्षात परिचित होते. काँग्रेसचे निष्ठावान म्हणून ते ओळखले जात. पुण्यात काँग्रेसची राजकीय स्थिती अवघड होत असतानाही पक्षाच्या जून्या कार्यकर्त्यांची एक फळी त्यांनी नेटाने टिकवून ठेवली होती. अलीकडच्या काळात प्रक्रुती अस्वाथ्यामुळे त्यांनी शहरातील संपर्क कमी केला होता. तरीही काँग्रेस भवनमधील कार्यक्रमांना ते आवर्जून ऊपस्थित रहात.
माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्याबरोबर रणपिसे यांचा स्नेह होता. पुण्यातच स्थायिक असलेल्या पाटील यांंनी बुधवारी दुपारी रूग्णालयात येऊन रणपिसे यांची भेट घेतली. शरद माझा धाकटा भाऊ आहे त्याला लवकर बरे करा असे डॉक्टरांंना सांगत पाटील यांनी रूग्णालयात अर्धातास रणपिसे यांच्यासमवेत व्यतीत केला असे नगरसेवक अविनाश साळवे यांनी सांगितले.