Top Newsराजकारण

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; १० मार्चला मतमोजणी

उत्तर प्रदेशात ७ टप्प्यात मतदान; १५ जानेवारीपर्यंत रोड-शो, प्रचार सभांना परवानगी नाही; निवडणूक आयोगाचा निर्णय

नवी दिल्ली : देशातील उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर आज वाजले. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार सात टप्प्यामध्ये होणार मतदान होणार आहे. सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक टप्प्यात सात टप्प्यात मतदान होणार आहे, तर १० मार्चला मतमोजणी होणार आहे. दिल्लीत पत्रकार परिषदेमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी पाच राज्यातील निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशसह ऊर्वरित चारही राज्यांमध्ये आजपासून निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. सर्व पाच राज्यात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. एकूण ४०३ आमदार असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये सर्व सात टप्प्यांत मतदान होणार आहे. त्यातील पहिल्या टप्प्याचे मतदान १० फेब्रुवारी रोजी होणार आहे. तर शेवटच्या टप्प्यातील मतदान हे ७ मार्च रोजी होणार आहे.

पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यामध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. या तिन्ही राज्यांमध्ये १४ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तर मणिपूरमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. मणिपूरमध्ये २७ फेब्रुवारी आणि ३ मार्च अशा दोन टप्प्यात मतदान होणार आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये १०, १४, २०, २३, २७ फेब्रुवारी आणि ३ व ७ मार्च अशा एकूण सात टप्प्यात मतदान होईल.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका होत असल्याने निवडणूक आयोगाने काही खास उपाययोजना केल्या आहेत. कोरोना काळात निवडणूक घेणे आव्हानात्मक असल्याचे सांगत मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा म्हणाले की, कोरोनाकाळात सुरक्षितपणे निवडणुका घेणे ही आमची जबाबदारी आहे. वेळेत निवडणुका घेणे ही आमची जबाबदारी असून, कोरोनाचे सर्व नियम पाळून ह्या निवडणुका घेतल्या जातील. प्रत्येक बुथवर मास्क आणि सॅनिटायझरची व्यवस्था केली जाईल. या निवडणुकीमध्ये एकूण १८.३ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यामधील साडे आठ कोटी मतदार ह्या महिला आहेत. तर २४ लाखांहून अधिक मतदार हे पहिल्यांदान मतदानाचा हक्क बजावतील.

८० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक. दिव्यांग आणि कोरोनाबाधित रुग्ण हे मतपत्रिकांच्या माध्यमातून मतदान करू शकतील. कोरोनामुळे पाचही राज्यातील मतदानाची वेळ एका तासाने वाढवण्यात आली आहे. तसेच सर्व उमेदवारांना त्यांच्यावर दाखल गुन्ह्यांची माहिती माहिती द्यावी लागणार आहे. तसेच १५ जानेवारीपर्यंत कुठल्याही सभा, पदयात्रा, सायकल यात्रा यावर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. याबाबत पुढील निर्णय नंतर घेण्यात येईल, असे निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

१५ जानेवारीपर्यंत रोड-शो, राजकीय सभांना परवानगी नाही

निवडणुकीच्या तारखा जाहीर करतानाच निवडणूक आयोगानं कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर काही कडक निर्बंध आणि नियम देखील जाहीर केले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांच्या प्रचार कार्यक्रमावर मर्यादा येणार आहे. देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता निवडणूक आयोगानं १५ जानेवारी २०२२ पर्यंत निवडणूक होणाऱ्या पाचही राज्यांमध्ये म्हणजेच उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाला जाहीर सभा, सायकल किंवा बाईक रॅली, रोड शो आयोजित करता येणार नसल्याचं जाहीर केलं आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांची निवडणूक आयोगाकडून दखल घेतली जाईल आणि योग्य ती कारवाई केली जाईल असंही निवडणूक आयोगानं यावेळी स्पष्ट केलं आहे. सर्व राजकीय पक्षांना यावेळी फक्त सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमातून प्रचार करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

देशातील कोरोना परिस्थिती लक्षात घेता राजकीय पक्षांनी प्रसारासाठी सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर करावा, असं आवाहन निवडणूक मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी केलं आहे. पाचही राज्यांमध्ये १५ जानेवारीपर्यंत कोणत्याही राजकीय सभा, सायकल किंवा बाईक रॅलीसह नुक्कड सभा आणि जनतेच्या संपर्कात येणारे तसंच गर्दी होणारे प्रचार कार्यक्रम घेता येणार नाहीत. १५ जानेवारीनंतरच्या परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील नियम जाहीर केले जातील असंही निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

५ राज्यांची सद्यस्थिती

उत्तर प्रदेश

निवडणुका घोषित झालेल्या ५ राज्यांपैकी सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये सध्या भाजपचे सरकार आहे. उत्तर प्रदेशमध्ये एकूण ४०३ जागांसाठी निवडणूक होत असून बहुमताचा आकडा गाठण्यासाठी २०२ जागांवर विजय मिळवावा लागेल. सध्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असून भाजपाने ३०३ जागांसह विजय मिळवला आहे. तर, समजावादी पक्ष ४९ जागांसह प्रमुख विरोधी पक्ष आहे.

पंजाब

पंजाबमध्ये ११७ जागांसाठी एकाच टप्प्यात निवडणूक होत असून सध्या येथे काँग्रेसचे सरकार आहे. चरणजीत सिंग चन्नी हे पंजाबचे मुख्यमंत्री आहेत. २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसने ७७ जागांसह बहुमत सिद्ध केलं आहे. तर, १७ जागांसह आम आदमी पक्ष दुसऱ्या स्थानावर आहे.

उत्तराखंड

उत्तराखंडमध्ये ७० जागांसाठी निवडणूक होत असून ३६ जागा जिंकत बहुमताचा आकडा गाठता येईल. सध्या येथे भाजपचे सरकार असून पुष्कर सिंह धामी हे मुख्यमंत्री आहेत. भाजपने ५३ जागांसह बहुमत सिद्ध केले आहे. तर, ९ जागांसह काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष आहे.

गोवा

गोव्यात ४० जागांसाठी निवडणूक होते असून राजकीय पक्षाला २१ जागांवर विजय मिळवत बहुमत सिद्ध करावे लागेल. सध्या, गोव्यात भाजपचे सरकार असून प्रमोद सावंत हे मुख्यमंत्री आहेत. २०१७ मध्ये भाजपने गोव्यात २५ जागा जिंकल्या आहेत.

मणिपूर

मणिपूरमध्ये सध्या भाजप आघाडीचं सरकार असून भाजपने २९ जागा जिंकल्या होत्या. सध्या येथे भाजप नेते एन.बीरेनसिंह हे मुख्यमंत्री आहेत. तर, १५ जागा जिंकत काँग्रेसने प्रमुख विरोधी पक्षपद मिळवले आहे. येथे नॅशनल पिपल्स फ्रंट आणि नॅशनल पिपल्स पार्टीनेही भाजपसोबत हातमिळवणी केली आहे.

दरम्यान, एकूणच निवडणूक जाहीर झालेल्या ५ राज्यांपैकी ४ राज्यात भाजपचा मुख्यमंत्री आणि भाजपचे सरकार आहे. तर, केवळ पंजाबमध्ये काँग्रेसचं सरकार आणि मुख्यमंत्री आहे. त्यामुळे, आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये काय होणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक ७ टप्प्यात

पाच राज्यांपैकी उत्तर प्रदेश निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. लोकसंख्येच्या दृष्टीनं उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठं राज्य आहेच. पण राजकीय दृष्ट्यादेखील हे सर्वात महत्त्वाचं राज्य आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून ४०३ जागांसाठी एकूण ७ टप्प्यात मतदान होणार आहे. यात अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च रोजी सातही टप्प्यांसाठीचा निकाल जाहीर होणार आहे.

उत्तर प्रदेशच्या विधानसभेचा कार्यकाळ १४ मार्च २०२२ रोजी संपणार आहे. उत्तर प्रदेशात ४०४ विधानसभा आणि विधान परिषदेत १०० सदस्य असतात. उत्तर प्रदेशात सध्या भाजपाचे सरकार आहे. तर मुख्य विरोधी पक्षात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीचा समावेश आहे. उत्तर प्रदेश विधानसभेत एकूण ४०४ सदस्यांमध्ये ४०३ निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे.

२०१७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपानं ३१२ जागांवर घवघवीत यश प्राप्त करत सत्ता स्थापन केली होती. भाजपाला निवडणुकीत एकूण ३९.६७ टक्के मतं मिळाली होती. तर समाजवादी पक्षानं ४७ आणि बहुजन समाज पक्षानं १९ जागांवर विजय प्राप्त केला होता. काँग्रेसला केवळ सात जागा प्राप्त झाल्या होत्या.

पंजाबमध्ये एकाच टप्प्यात निवडणूक; म्हणून निवडणूक चर्चेत राहणार

पंजाबमध्ये नुकतेचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षा यंत्रणेत झालेली गडबड, माजी मुख्यंत्री कॅप्टन अरमिंदर सिंग यांनी काँग्रेसला केलेला रामराम आणि पंजाबमधील शेतकऱ्यांचं दिल्लीच्या सीमारेषेवर तब्बल वर्षभर चाललेलं आंदोलन, या घटनांमुले पंजाबच्या निवडणुकीत चांगलीच रंगत आली आहे. सध्या पंजाबमध्ये काँग्रेसचं सरकार असून चरणजीतसिंग हे मुख्यमंत्री आहेत. तर, आम आदमी पक्षानेही चंढीगड महापालिका निवडणुकीत वर्चस्व मिळवले. त्यामुळे, पंजाबमध्ये आप आणि भाजपच्या प्रचारयंत्रणेकडेही देशाचे लक्ष लागून असणार आहे.

उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यांत मतदान – पहिला टप्पा १० फेब्रुवारी २०२२, दुसरा टप्पा १४ फेब्रुवारी २०२२, तिसरा टप्पा २० फेब्रुवारी २०२२, चौथा टप्पा २३ फेब्रुवारी २०२२, पाचवा टप्पा २७ फेब्रुवारी २०२२, सहावा टप्पा ३ मार्च २०२२, सातवा टप्पा ७ मार्च २०२२.

पंजाबमध्ये एकाच टप्प्यात मतदान – मतदानाची तारीखः १४ फेब्रुवारी २०२२

गोव्यात एकाच टप्प्यात मतदान – मतदानाची तारीखः १४ फेब्रुवारी २०२२

उत्तराखंडमध्येही एकाच टप्प्यात मतदान – मतदानाची तारीखः १४ फेब्रुवारी २०२२

मणिपूरमध्ये दोन टप्प्यात मतदान : पहिला टप्पा २७ फेब्रुवारी, दुसरा टप्पा ३ मार्च.

उत्तराखंडमधील निवडणूक समिकरण

एकूण ७० जागा असलेल्या उत्तराखंड विधानसभेचा कार्यकाळ २३ मार्च २०२२ रोजी संपत आहे. मात्र, राज्यात निवडणुकीचे वातावरण तापले आहे. येथे काँग्रेससह भाजप, आम आदमी पार्टी, बसपा आणि अनेक छोटे पक्ष आपले नशीब आजमावणार आहेत. तथापि, उत्तराखंडची निवडणूक भाजपसाठी सर्वात आव्हानात्मक आहे. कारण येथे गेल्या दोन दशकांपासून दर पाच वर्षांनी सत्ता बदलण्याची परंपरा आहे. अशा स्थितीत काँग्रेसला पुन्हा सत्तेत येण्याची आशा आहे. पण कांग्रेसला टक्कर देत भाजप सत्ता परिवर्तनाची परंपरा मोडीत काढण्यासाठी प्रयत्न करेल.

उत्तराखंडमध्ये २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ५७ जागा जिंकल्या आणि प्रचंड बहुमताने आपले सरकार स्थापन केले. तर काँग्रेसला केवळ ११ जागाच मिळाल्या होत्या. यानंतर त्रिवेंद्रसिंह रावत मुख्यमंत्री झाले, मात्र त्यांना चार वर्षांनी हटवून भाजपने सत्तेची धुरा तीरथसिंह रावत यांच्याकडे सोपवली. मात्र काही महिन्यांतच तीरथ सिंह रावत यांच्या जागी पुष्कर सिंह धामी यांना उत्तराखंडचे मुख्यमंत्री बनवण्यात आले.

कोविडबाधितांच्या घरी टीम जाणार

दरम्यान, यावेळी कोविडबाधित मतदारांसाठीही निवडणूक आयोगानं विशेष व्यवस्था केली आहे. कोविडबाधितकिंवा संशयित व्यक्तीच्या घरी निवडणूक आयोगाची व्हिडीओ टीम विशेष व्हॅननं जाणार आहे. तसंच त्यांनाही यावेळी मतदान करता येईल. त्यांना बॅलेट पेपरच्या मदतीनं मतदान करण्याचा अधिकार मिळेल.

गोव्यात यावेळी कोणाची सत्ता?

४० जागा असलेल्या गोवा विधानसभेचा कार्यकाळ १५ मार्चला पूर्ण होत आहे. राज्यात यापूर्वी विधानसभा निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये झाली होती. १५ जागांवर विजय मिळवत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. परंतु त्यांना सरकार स्थापन करण्यात अपयश आलं होतं. भाजपनं १३ जागांवर विजय मिळवला होता. परंतु एमजीपी, जीएफपी आणि दोन अपक्ष उमेदवारांना सोबत घेऊन भाजपनं सरकार स्थापन केलं. मनोहर पर्रिकर यांच्याकडे गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आली. परंतु १७ मार्च २०१९ रोजी मनोहर पर्रिकर यांचं निधन झालं आणि त्यानंतर डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आली.

यावेळी भाजप आणि काँग्रेससोबत निवडणुकीच्या रिंगणात आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेसही उतरले आहे. गोव्यात गेल्या १० वर्षांपासून भाजप सत्तेत आहेत. भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डाही पूर्ण ताकदीनीशी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसही पूर्णपणे ताकदीनीशी उतरण्याच्या तयारीत आहे. काँग्रेसच्या काही नेत्यांनी निवडणुकीपूर्वी टीएमसीमध्ये प्रवेश केला आहे. २०१७ मध्ये पार पडलेल्या निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाला एकाही जागेवर विजय मिळवता आला नव्हता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button