Top Newsराजकारण

काँग्रेसला मोठा धक्का; जितिन प्रसाद यांचा भाजपात प्रवेश

नवी दिल्ली : माझे घराणे तीन पिढ्यांपासून काँग्रेसशी जोडलेले होते. यामुळे काँग्रेस सोडताना मी बराच काळ विचार केला. गेल्या ८-१० वर्षांपासून मला एकच पक्ष खरा राष्ट्रीय वाटत होता, तो म्हमजे भाजपा. बाकी सारे पक्ष हे स्थानिक झाले आहेत, असे काँग्रेसचे नेते जितिन प्रसाद यांनी भाजपात पक्षप्रवेश केल्यानंतर म्हटले.

काही काळापर्यंत राहुल गांधींचे निकटवर्तीय समजले जाणारे उत्तर प्रदेशमधील काँग्रेसचे दिग्गज नेते जितिन प्रसाद यांनी आज दुपारी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीला काही महिने उरले असताना जितिन प्रसाद यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे. जितिन प्रसाद यांनी आज केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत ते प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, नड्डा भाजपा मुख्यालयात अनुपस्थित होते. त्यानंतर मात्र नड्डा यांनी जितीन प्रसाद यांचे स्वागत केले.

२००४ मध्ये जितीन प्रसाद यांनी शाहजहाँपूर येथून लोकसभेची निवडणूक जिंकून संसदेत प्रवेश केला होता. दरम्यान यूपीओ-१ च्या काळात त्यांना मंत्री बनवण्यात आले होते. तेव्हा त्या सरकारमधील युवा मंत्र्यांपैकी ते एक होते. २००९ मध्ये जितीन प्रसाद यांनी धौराहा लोकसभा मतदारसंघातून लढून विजय मिळवला होता. यूपीए-२ सरकारच्या काळात त्यांनी पेट्रोलियम, रस्ते वाहतूक यासारखी महत्त्वाची खाती सांभाळली होती. मात्र २०१४ च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशात आलेल्या जबरदस्त मोदी लाटेत त्यांचा पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर २०१७ मधील उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला होता. या पराभवांनंतर ते काँग्रेसच्या राजकारणातील मुख्य प्रवाहापासून काहीसे बाजूला फेकले गेले होते.

देशाच्या भविष्यासाठी, कठीण प्रसंगांत जर कोणता पक्ष आणि नेता उभा असेल तर ती भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. जर मी माझ्या लोकांच्या हिताचे रक्षण करू शकत नाही, तर अशा पक्षात राहण्यात काय अर्थ आहे, असे मला काँग्रेसमध्ये वाटत होते. मी तिथे काहीच करू शकत नव्हतो. मला ज्या काँग्रेस नेत्यांनी आशिर्वाद दिला त्यांचा मी आभारी आहे, आता मी भाजपाचा कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे, असे प्रसाद म्हणाले.

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तयारीने वेग घेतला आहे. काँग्रेस सुस्त पडलेली असताना भाजपाने मुख्यमंत्र्यांपासून आमदारांच्या कामाचा आढावा आणि मतदारसंघातील वातावरणाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. याचबरोबर आज भाजपाने काँग्रेसला जोरदार झटका दिला आहे.

आता राहुल गांधी यांनी स्वतः भाजपात प्रवेश करावा : निलेश राणे

दरम्यान, जितिन प्रसाद यांच्या भाजप प्रवेशानंतर माजी खासदार निलेश राणे यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना टोला लगावला आहे. ट्विटमध्ये निलेश राणे म्हणाले की, राहुल गांधींच्या सगळे जवळचे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. राहुल गांधींच्या स्वभावाचाचं हा एक भाग आहे. मला सगळं कळतं आणि मीच सर्वात शहाणा हा स्वभाव काँग्रेसला घेऊन बुडाला आहे. आता राहुल गांधी यांनी स्वतः भाजपात प्रवेश करावा, हाच त्यांच्यासमोर शेवटचा पर्याय उरला आहे, असा टोला निलेश राणेंनी लगावला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button