पुणे : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन हटवण्याबाबत आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बैठकीत तत्त्वत: मान्यता देण्यात आली. त्याबाबत खात्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घाईघाईत पत्रकार परिषद घेत घोषणा केली आणि एकच संभ्रम निर्माण झाला. वडेट्टीवारांच्या पत्रकार परिषदेनंतर मुख्यमंत्री कार्यालयानं एक निवेदन जारी करत नवे नियम फक्त विचाराधीन असल्याचं सांगितलं. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील तोच अंतिम निर्णय असेल असं स्पष्ट केलं आहे. काही भागात शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात वेगळ्या बातम्या आल्या त्यामुळे समज-गैरसमज निर्माण झाल्याचं अजित पवार म्हणाले.
राज्यातील काही भागात शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवस जाऊ देऊन सोमवारी तो जाहीर होईल. ग्रामीण भागातील रुग्णसंख्या कमी होत नसल्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये वेगळा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिलीय. त्याचबरोबर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत नियोजन सुरु आहे. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवरील उपाचाराची बिलं भलीमोठी येत होती. पण आता सरकार रुग्णालयात या रुग्णांवर मोफत उपचार होत आहेत. तसंच खासगी रुग्णालयांनाही दर ठरवून दिले आहेत. त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळेल, असंही अजित पवार म्हणाले. त्याचबरोबर म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शन्सची अजून कमतरता असल्याचंही त्यांनी सांगितलं.
आषाढी वारीबाबतही अजित पवारांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत वारीसंदर्भात एक कमिटी नियुक्त करण्यात आली आहे. कुंभ मेळ्यानंतर कोरोनाचं संकट वाढल्याचं आपण पाहिलं. वारकऱ्यांनाही ते समजून सांगण्यात आलं. पण वारकऱ्यांचं म्हणणं आहे म्हणून अजून एक संधी देऊन पालखी सोहळ्याचं नियोजन करण्यासाठी समिती गठीत केली आहे. विभागीय आयुक्त, तिन्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचा समावेश या कमिटीमध्ये असेल. या कमिटीचा निर्णय आल्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन वारीबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती अजितदादांनी दिलीय.
खेडमधील वाद चर्चेतून मिटविणार
महाविकास आघाडीने सरकारमध्ये काम करताना वरिष्ठ पातळीवर एकोप्यानं राहण्यांचं ठरवलं आहे. तो तळागाळापर्यंत वेळ लागतो. आम्ही राष्ट्रवादीच्या खेडमधील पदाधिकाऱ्यांना सांगू. शिवसेनेनंही तिथल्या पदाधिकाऱ्यांना सांगून हा वाद मिटवला जाईल, असंही अजित पवार यांनी म्हटलंय.