ठाणे : हिंदुत्व विरोधी किंवा हिंदुंच्या सणांच्या विरोधी असणारे सरकार अशी टीका करणाऱ्यांना मी सांगेन की केंद्राकडून देखील तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांनी देखील दहीहंडी किंवा गणेशोत्सवाच्या काळात सतर्कता बाळगा, असे पत्र राज्य शासनाला दिले आहे. त्यामुळे राज्य सरकार हे हिंदुत्व विरोधी किंवा हिंदुच्या सणांच्या विरोधी असणारे सरकार नसल्याचे स्पष्टोक्ती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली आहे. तसेच दहीहंडी किंवा मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन करुन जनतेचा जीव धोक्यात घालणाऱ्यांनी कोरोना विरुध्द आंदोलन उभे करावे, असा टोला देखील त्यांनी भाजप किंवा मनसेचे नाव न घेता लगावला आहे.
ठाण्यात संस्कृती युवा प्रतिष्ठानच्यावतीने उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण ऑनलाईन पध्दतीने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत, आमदार रवींद्र फाटक, महापौर नरेश म्हस्के यांच्यासह संस्कृती युवा प्रतिष्ठानचे प्रमुख तथा आमदार प्रताप सरनाईक हे देखील उपस्थित होते. सध्या दहीहंडीच्या उत्सवावरुन व मंदिरे उघडी करण्यावरून आंदोलने सुरु आहेत. मात्र, हे कोणतेही स्वातंत्र्य युद्ध नसून ते मिळालेच पाहिजे असे नाही. तर आंदोलन करायचेच असेल तर कोरोना विरुध्दच करा, असा सल्ला त्यांनी भाजपला दिला आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असताना देखील तसेच टास्कफोर्स व तज्ज्ञांनी देखील त्यादृष्टीने काळजी घेण्याचे आवाहन केले असतांना देखील आंदोलन, यात्रा काढून जनतेचा जीव धोक्यात घालण्याचे काम अशा महाभागांकडून सुरु असल्याची टीकादेखील त्यांनी भाजपवर केली. नवीन सुविधा द्यायच्या नाहीत, परंतु जनतेची जीव धोक्यात घालून यात्रा काढायच्या हाच उद्देश भाजपचा असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. परंतु शिवसेनेची शिकवण आणि बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार आमच्यात आजही जिवंत असल्याने शिवसेनेच्या माध्यमातून अॅम्ब्युलन्स, ऑक्सीजन प्लान्ट व इतर सेवा उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे काही करायचेच असेल तर या सुविधा उभ्या करा, असा सल्ला देतानाच त्यासाठी हिम्मत असावी लागते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
शिवसेनेच्या माध्यमातून आजही ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण केले जात आहे. याच २० टक्के राजकारणातून सत्तेच्या माध्यमातून जनतेची सेवा केली जात आहे. परंतु इथे जनतेसाठी काही करायचे नाही, उलट १०० टक्के राजकारण करुन जनतेचा जीव धोक्यात घालून ते जगले काय किंवा त्यांना काही झाले तरी त्याची पर्वा या यात्रा काढणाऱ्यांना नसल्याची टीका देखील त्यांनी भाजपचे नाव न घेता केली. तर आम्ही जे ठरवितो ते करतोच त्यासाठी तारीख पे तारीख देत नसल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. तर सरनाईक यांच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लान्टचे कौतुकही त्यांनी केले.
मी सर्वांना ऑक्सिजन देतो, पण मला आणि इतरांना संजय राऊत ऑक्सिजन देतात !
प्रताप सरनाईक यांनी यावेळी खास करुन संजय राऊत यांचे आभार मानले. ते म्हणाले, मी सर्वांना ऑक्सिजन देतो, पण मला ऑक्सिजन देण्याचं काम संजय राऊत करतात. आता दुसऱ्यांनाही ते ऑक्सिजन देत आहेत, त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार.