
मुंबई : मुंबई ड्रग्स पार्टी प्रकरणी आर्यन खानला अटकेच्या कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले होते. त्यांच्याविरोधात दाखल केलेली ज्ञानदेव वानखेडे यांची याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. तसंच, मलिक यांनाही पुरावे एकदा तपासून आरोप करावेत, अशी सूचना केली आहे.
नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांनी आर्यन खानला केलेली अटक ही बनावट असल्याचं सांगत अनेक पुरावे सादर केले होते. एवढंच नाहीतर समीर वानखेडे हे मुस्लिम असल्याचा दावाच करत त्यांनी अनेक फोटो आणि कागदपत्र ट्वीट केले होते. त्यामुळे वानखेडे कुटुंबीयांनी बचावासाठी कोर्टात धाव घेतली होती.
ज्ञानदेव वानखेडे यांनी केलेल्या मानहानीच्या दाव्यावर आज हायकोर्टात सुनावणी झाली. पण या सुनावणीत ज्ञानदेव वानखेडे यांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. नवाब मलिक यांनी केलेले आरोप खोटे आहेत, असं प्रथमदर्शनी वाटत नाही, असं निरीक्षण हायकोर्टाने नोंदवलं आहे.
तसंच नवाब मलिक यांना समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात काहीही आक्षेपार्ह बोलण्यास मनाई करण्याचे आदेश देण्यास मुंबई हायकोर्टाने दिला नकार दिला आहे.
समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांना मुंबई हायकोर्टात याची दाखल केली होती. पण, आज कोर्टाने त्यांना दिलासा दिला नाही. नवाब मलिक यांना समीर वानखेडे व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात काहीही आक्षेपार्ह बोलण्यास मनाई करण्यास मुंबई हायकोर्टाने स्पष्ट नकार दिला आहे. मात्र, नवाब मलिक यांना यापुढे वाजवी पद्धतीने माहितीची खातरजमा करूनच ट्विट करण्याचे हायकोर्टाने निर्देश दिले आहे.
सत्यमेव जयते
अन्याय के खिलाफ हमारी जंग जारी रहेंगी— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 22, 2021
ज्ञानदेव वानखेडे यांची याचिका हायकोर्टाने फेटाळून लावल्यानंतर नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘सत्यमेव जयते’ म्हणत चुकीच्या बाबी विरोधातला आपला लढा सुरूच राहणार, असं मलिक यांनी आता ठणकावून सांगितलं आहे. त्यामुळे याही पुढे आता नवाब मलिक वानखेडे कुटुंबावर आरोप करू शकता हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.




