मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर हॉटेल, बार, रेस्टॉरंट्स, मॉल्स काही निर्बंधांसह सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, सिनेमागृह आणि नाट्यगृह सुरु करण्याचा निर्णय अद्याप घेण्यात आला नव्हता. मात्र, आता ५० टक्क्यांच्या मर्यादेसह ५ नोव्हेंबरपासून नाट्यगृह सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. नाट्यक्षेत्रातील काही मान्यवर कलाकारांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी नाट्यगृह सुरु करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ५ नोव्हेंबरपासून नाट्यगृहे सुरु करण्यास परवानगी दिली आहे. तसा आदेश संबंधित सगळ्या शासकीय अधिकारी आणि विभागांना ताबडतोब देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत चर्चेसाठी अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष नवनाथ मच्छिन्द्र कांबळी, प्रवक्ते मंगेश कदम, मराठी नाट्यव्यासायिक निर्माता संघाचे अध्यक्ष संतोष भरत काणेकर, रंगमंच कामगार संघटनेचे अध्यक्ष किशोर वेल्ले, विजय केंकरे, रंगकर्मी आंदोलन प्रतिनिधी विजय राणे उपस्थित होते. आदेश बांदेकर आणि सुबोध भावे यांनी ही भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले. या सगळ्यांच्या उपस्थितीत नाट्यगृहे सुरु करण्याबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय.
कोरोना संपुष्टात आलेला नाही. तिसऱ्या लाटेचाही धोका आहे. गर्दी वाढत राहिली तर तिसरी लाट अपेक्षेपेक्षा लवकर येईल, असं सांगतानाच राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला तर राज्यात पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन करावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी दिलाय. मुंबई महानगर पालिका आणि मुंबई विद्यापीठाने लहान मुलांचे कोव्हिड सेंटर उभारले आहे. त्याचं लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी त्यांनी हा इशारा दिला. ऑक्सिजन साठ्यात फार काही विशेष वाढ झालेली नाही. तो ज्यावेळी ७०० मेट्रिक टन टच करू एवढं ऑक्सिजनची गरज आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची गरज पडल्यास राज्यात कदाचित लॉकडाऊन लावावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.
मुंबई गणेशोत्सवासाठी नियमावली
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सव काळात गर्दी टाळण्यासाठी गणेश चतुर्थीच्या तीन-चार दिवसांआधीच भाविकांनी मूर्ती घरी आणावी, असे आवाहन मुंबई महापालिकेने भाविकांना केले आहे. तसेच नैसर्गिक विसर्जन स्थळावरही नागरिकांना थेट विसर्जन करण्यास मनाई करण्यात आली आहे. अशा स्थळांवर मूर्ती संकलनाची व्यवस्था संबंधित विभाग कार्यालयामार्फत करण्यात येणार आहे. तेथेच नागरिकांनी आपल्या गणेशमूर्ती जमा कराव्यात, असे महापालिकेने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केलं आहे.
कोरोनामुळे यावर्षी गणेशोत्सवासाठी कडक नियमावली तयार करण्यात आली आहे. बहुतांश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे गणेशमूर्तींची स्थापना 15 दिवस आधी करत असतात. मात्र यंदा सार्वजनिक मंडळांमध्ये नेहमीचा उत्साह दिसून येत नाही. तसेच घरगुती गणेश उत्सव यावरही काही नियम लागू करण्यात आले आहेत.