Top Newsराजकारण

गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?

गांधीनगर : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी शनिवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानं राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली. विजय रुपाणी यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट घेऊन राजीनामा सोपवला. रुपाणी यांच्या राजीनाम्यामुळे आता गुजरातचा पुढील मुख्यमंत्री कोण? यावर चर्चा रंगली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत मनसुख मांडविया, पुरुषोत्तम रुपाला आणि नितिन पटेल ही नावे सर्वात पुढे आहेत. तर सी. आर. पाटील यांनी आपण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले आहे.

गुजरातमधील भाजपच्या आमदारांची आज बैठक होणार आहे. त्यामध्ये गुजरातचा नवीन मुख्यमंत्री निवडण्यात येईल. आमदारांच्या बैठकीसाठी मनसुख मांडविया आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री नितिन पटेल गांधीनगरमध्ये पोहचले आहेत. भाजपच्या अन्य बड्या नेत्यांनीही पक्षाच्या कार्यालयात येऊन सध्याच्या राजकीय स्थितीबाबत चर्चा केली.

गुजरातच्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या एक वर्ष आधीच त्या राज्याचे भाजपचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी शनिवारी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. रुपानी यांच्या नेतृत्वाबद्दल गुजरातमधील पटेल समाजात नाराजी होती. त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी विधानसभा निवडणुकांत भाजपला विजय मिळणे शक्य नाही, हे स्पष्ट दिसत होते. तसेच त्यांना गुजरातमधील कोरोना स्थिती नीट हाताळ‌ता आली नाही. या तीन महत्वाच्या कारणांमुळे गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून विजय रुपाणी यांना हटविण्यात आल्याची चर्चा आहे.

मात्र २०२२ साली गुजरातच्या विधानसभा निवडणुका भाजप रुपानी यांच्या नेतृत्वाखाली लढणार नाही, हे काही प्रसंगांतून लक्षात आले होते. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी सी. आर. पाटील यांची जुलै २०२० मध्ये निवड हा पहिला संकेत होता. पाटील हे मोदी यांचे निकटवर्तीय आहेत. मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातील कामांची नीट व्यवस्था लावण्याचे काम पाटील पाहात असत. गुजरातमधील कोरोना स्थिती विजय रुपानी यांनी नीट न हाताळल्याने भाजप नेतृत्व व जनता असे दोघेही त्यांच्यावर नाराज होते. कर्नाटकमध्ये येडीयुरप्पा व उत्तराखंडमध्ये तीरथसिंह रावत यांनाही काही महिन्यांपूर्वी भाजपने मुख्यमंत्रीपदावरून हटविले होते.

गुजरातच्या पुढील मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत मनसुख मंडाविया यांच्यासह केंद्रीय मत्स्यपालन, पशुपालन मंत्री पुरुषोत्तम रुपाला, चंद्रकांत पाटील यांचं नाव चर्चेत आहे. मनसुख मंडाविया यांना जुलै महिन्याच्या मोदी कॅबिनेट विस्तारात स्थान देऊन डॉ हर्षवर्धन यांच्याजागी आरोग्य मंत्रालयाची धुरा सांभाळायला दिली. गोरधन जदाफिया यांच्याही नावाची चर्चा मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया आणि केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांचं नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत येण्यामागे एक कारण म्हणजे ते पटेल समुदायातून येतात. गुजरातच्या राजकारणात पटेल समुदाय महत्त्वाची भूमिका निभावतो. पटेल समुदायात कदवा आणि लेउवा पटेल असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅबिनेट विस्तारात दोन्हीही पाटीदार समाजाला स्थान दिलं आहे. पुरुषोत्तम रुपाला कदवा पाटीदार आणि मनसुख मंडाविया लेउवा पाटीदार आहेत. परंतु आता हे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button