मुंबईत ८ वी ते १२ वी चे वर्ग ४ ऑक्टोबरपासून सुरु होणार
मुंबई : मुंबईतील शाळा सुरू करण्यास आयुक्तांकडून परवानगी मिळाली आहे. मुंबईतील सर्व माध्यमांच्या, व्यवस्थापनच्या आणि मंडळांच्या ८ वी ते १२ वी च्या शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून यासंबधी अधिकृत परिपत्रक पालिका शिक्षण विभागाकडून लवकरच जारी करण्यात येणार आहे.
मागील तब्बल दीड वर्षे शाळा, शैक्षणिक संस्था बंद आहेत. राज्याच्या कोविड १९ ची रुग्णसंख्या कमी असलेल्या विविध जिल्ह्यांत ८ वी ते १२ वी च्या शाळा सुरू आहेत. मात्र मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळा या मागील दीड वर्षात प्रथमच उघडल्या जाणार आहेत. राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय झाल्यावर मुंबई पालिका शिक्षण विभागाकडे पालिका आयुक्तांकडे यासंबधी प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला आज, बुधवारी मंजुरी मिळाली असून शिक्षण विभागाकडून यासंबधी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या जाणार आहेत. आयुक्त इकबाल सिंह यांनीही ट्विट करत ही माहिती दिली आहे.