आरोग्यशिक्षण

मुंबईतील सर्व शाळांमध्ये बुधवारपासून ऑनलाईन शिक्षण

कोरोना वाढल्याने महापालिकेचा मोठा निर्णय

मुंबई : मुंबईसह राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा (Corona Virus) धोका मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्याला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने वेढा घातल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर अनलॉक प्रक्रियेअंतर्गत खुल्या केलेल्या विविध गोष्टींवर पुन्हा एकदा निर्बंध आणले जात आहेत. या पार्श्वभूमीवर आता मुंबई महानगरपालिकेनेही शहरातील शाळांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

मुंबईतील सगळ्या माध्यमाच्या सर्व शाळांनी 17 मार्चपासून ऑनलाइन वर्ग घ्यावेत, अशा सूचना महापालिकेकडून देण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे आता शिक्षकांना शाळेत उपस्थिती लावता येणार नाही. कोव्हिडचा वाढता संसर्ग पाहता पालिकेने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, याआधी शाळेत 50 टक्के उपस्थिती लावता येत होती. मात्र आता नव्या आदेशाचे परिपत्रक मुंबई मनपाचे शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी काढलं आहे.

मुंबईत आज पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मुंबईत आज 1 हजार 922 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर 4 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.

महाराष्ट्रातील कोरोना उपाययोजनांबाबत केंद्र सरकारने नाराजी व्यक्त केली आहे. ‘महाराष्ट्रातील कोविडबाधित प्रकरणं दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेला राज्यात सुरूवात होत आहे. तरीही राज्य सरकारने पुरेशा व्यवस्था केलेल्या नाहीत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, चाचण्या करणं, सोशल डिस्टन्सिंग राखणं त्याचबरोबर संभाव्य धोका लक्षात घेऊन रुग्णालयं सुसज्ज करणं या सगळ्याच पातळ्यांवर महाराष्ट्र सरकारचं दुर्लक्ष होत आहे. संभाव्य कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारने सज्ज व्हावं,’ असा इशारा केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button