किरीट सोमय्यांच्या विरोधात सिव्हिल आणि क्रिमिनल याचिका
नागपूर : भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी खासदार किरिट सोमय्या हे वारंवार काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना नेत्यांच्याविरोधात गरळ ओकत असतात. बिनबुडाचे आरोप करुन नाहक बदनामी करत असतात. सोमय्या यांच्या बेताल व बिनबुडाच्या वक्तव्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सोमय्या यांच्या विरोधात नागपूर कोर्टात सिव्हिल आणि क्रिमिनल याचिका दाखल केली आहे.
पत्रकारांशी बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, सतत खोट्या आरोपांची राळ उडवून महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांना बदनाम करण्याचे काम सोमय्या करत आहेत. स्वतःच तपास अधिकारी व स्वतःच न्यायाधीश असल्याच्या आविर्भात ते विरोधी पक्षांच्या नेत्यांवर सातत्याने खोटे आरोप करून बदनामी करत आहेत. किरीट सोमय्या यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीवर बोलताना वसुलीच्या पैशातील ४० टक्के शिवसेना, ४० टक्के राष्ट्रवादी काँग्रेस व २० टक्के काँग्रेसला मिळतो असा धादांत खोटा आरोप करून काँग्रेस पक्षाची बदनामी केली आहे. सोमय्या यांच्या या बेताल, बिनबुडाच्या आरोपाविरोधात अतुल लोंढे यांनी आज नागपूर न्यायालयात याचिका दाखल केली आहे.