Top Newsराजकारण

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत ५०० कोटींच्या घोटाळ्याची ‘ईडी’कडे तक्रार

नाशिक : राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २०१३-१४ या वर्षातील लेखापरीक्षणात घेण्यात आलेल्या आक्षेपातून सुमारे पाचशे कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे, असा दावा दिनकर पाटील आणि सुनील केदार यांनी केला आहे. लेखापरीक्षणासह अन्य कागदपत्रेही पुरावा म्हणून त्यांनी ईडीला सादर केली आहेत.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती हे माजी खासदार पिंगळे यांचे वर्षानुवर्षे सत्तास्थान असून मध्यंतरी शिवसेनेत असलेले शिवाजी चुंभळे यांनी त्यांच्या सत्तेला सुरूंग लावला होता. मात्र आता पुन्हा पिंगळे यांच्याच ताब्यात ही समिती आहे. त्यांच्या आणखी एका सत्ता स्थानाला म्हणजेच गोदावरी कृषक संस्थेला आव्हान देण्याचे काम भाजपाचे ज्येेष्ठ नगरसेवक दिनकर पाटील यांनी केले, मात्र त्यात यश आले नाही. त्यातच नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील गैरकारभाराच्या विरोधात लढणारे सध्या भाजपचे शहर सरचिटणीस असलेले सुनील केदार यांनी एकत्र येऊन बुधवारी बाजार समितीतील घोटाळ्याची तक्रार ईडीकडे केली. महाविकास आघाडी सरकारच्या ताब्यातील यंत्रणा निष्पक्षपणे चौकशी करतील अशी खात्री नसल्यानेच ही तक्रार थेट ईडीकडे करण्यात आल्याचे दिनकर पाटील यांनी सांगितले.

गेली २० वर्षे पिंगळे यांच्याकडे सत्ता असून त्यामुळेच घेाटाळ्याचा एकंदर हिशेब बघितला तर अब्जावधी रुपयांचा घोटाळा आहे, असेही त्यात नमूद असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि शेतकरी तसेच बाजार समितीच्या नुकसानीस कारणीभूत असणाऱ्या संबंधितांच्या विरोधात कारवाई करावी, असेही तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button