लॉकडाऊनच्या नियमांना नागरिकांचा हरताळ; राज्यात २४ तासांत ६३,७२९ नवे कोरोना रुग्ण
पुण्याच्या रुग्णवाढीची मोठी चिंता; दिवसभरात १०,९६३ नवे रुग्ण
मुंबई : राज्यात संचारबंदी लागू करून दोन दिवस पूर्ण झाले. तरी देखील अनेक ठिकाणी लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. लॉकडाऊनच्या नियमांना नागरिक हरताळ फासत आहेत. यामुळे दररोज ६० हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. शुक्रवारी २४ तासांत राज्यात ६३ हजार ७२९ नवे कोरोनाबाधित आढळले असून ३९८ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३७ लाख ३ हजार ५८४वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ५९ हजार ५५१ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात ४५ हजार ३३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण ३० लाख ४ हजार ३९१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.१२ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.६१ टक्के एवढा आहे.
शुक्रवारी नोंद झालेल्या एकूण ३९८ मृत्यूंपैकी २३४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ११० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ५४ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ५४ मृत्यू, पुणे- १७, बुलढाणा- ९, नाशिक- ७, नागपूर- ६, अहमदनगर- ४, जळगाव- ४, नांदेड- ३, ठाणे- ३ आणि लातूर- १ असे आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ३३ लाख ८ हजार ८७८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३७ लाख ३ हजार ५८४ (१५.८९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३५ लाख १४ हजार १८१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २५ हजार १६८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात अद्याप ६ लाख ३८ हजार ३४ हजार रुग्णांवर सुरू आहेत.
मुंबईत दिवसभरात ८,८३९ नवे रुग्ण
मुंबईत शुक्रवारी ८ हजार ८३९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई आतापर्यंत नोंद करण्यात आलेली रुग्णांची संख्या ५ लाख ६१ हजार ९९८ इतकी झाली आहे. मुंबई रुग्णसंख्येसोबतच मृत्यूसंख्याही वाढत आहे. मुंबईत आज ५३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. असे असले तरी मुंबईत ९ हजार ३३ जण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईत कोरोना चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आले आहे.
पुण्याच्या रुग्णवाढीची मोठी चिंता; दिवसभरात १०,९६३ नवे रुग्ण
पुण्याच्या नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येने शुक्रवारी मुंबईला मागे टाकले. मुंबईत आज दिवसभरात ८ हजार ८३९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून पुण्यात आज १० हजार ९६३ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर पुण्यात १०९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे आणि १० हजार २८२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. पुण्यातील आता कोरोनाबाधितांची संख्या ६ लाख ९६ हजार ९३३वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ११ हजार २१२ जणांचा मृत्यू झाला असून ५ लाख ८६ हजार ४५९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ९९ हजार ४३१ जणांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान आज दिवसभरात पिंपरी चिंचवडमध्ये २ हजार ५२९ नवे कोरोनाबाधित आढळले असून ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवडमधील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ७७ हजार ९३४वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत २ हजार ३१७ जणांचा मृत्यू झाला असून १ लाख ५३ हजार ६१० जण कोरोनामुक्त झाले आहेत.