राजकारण

आगामी निवडणुकांसाठी रा.स्व. संघाची तयारी; आता मुस्लीम बहुल भागांतही सुरु करणार शाखा !

चित्रकूट: मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवर असलेल्या चित्रकूट येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आरएसएसच्या अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठक सुरू होती. सरसंघचालक मोहन भागवत यांनी या शिबिरात राजकीय विचारमंथनही केले. पश्चिम बंगालमध्ये संघटना मजबूत करण्यासाठी तसेच आगामी काळात विविध राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, आता मुस्लीम बहुल भागांत शाखा सुरू करण्यावर भर दिला जाणार असल्याचे समजते.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या संघटनेत काही बदल केले असून, खांदेपालट करण्याचा निर्णय चित्रकूट येथील बैठकीत घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. क्षेत्र प्रचारक प्रदीप जोशी यांना अखिल भारतीय सह संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आता भैय्याजी जोशी यांना संघ आणि विश्व हिंदू परिषदेदरम्यानचे संयोजक असतील. तर, डॉक्टर कृष्ण गोपाल यांना विद्या भारतीचे प्रमुख संपर्क अधिकारी बनवण्यात आले आहे. तसेच अरुण कुमार यांना संघ आणि भाजपमध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

कोरोना कालावधीत बंद पडलेले कार्यक्रम आणि शाखा पुन्हा सुरू करण्यावर भर देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असून, विशेष म्हणजे आता देशभरातील मुस्लीम वस्त्यांमध्ये आपल्या शाखा सुरू करण्याचा निर्णय संघाने घेतल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय केवळ मोठ्या आणि लहान शहरांमध्ये असलेला संघाचा प्रभाव आता गावागावांमध्ये पोहोचवण्यासाठी योजना, रणनीती तयार करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

पश्चिम बंगालमध्ये संघटना मजबूत करण्यासाठी संघाने मोठा निर्णय घेतला असून, राज्याची तीन खंडांमध्ये विभागणी करुन काम करण्यात येणार आहे. पश्चिम बंगालमधील मुख्य कार्यालय कोलकातामध्ये, मध्य बंगालमधील कारभार वर्धमानमधून, तर राज्यातील उत्तरेकडील भागामधील संघाचे काम सिलीगुडीमधून हाताळले जाईल. पुढील वर्षी होणाऱ्या वेगवेगळ्या राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघाने ही रचना केल्याचे बोलले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button