नवी दिल्ली : कोकणातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी याबाबत घोषणा केली आहे. ९ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजता नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते विमानतळाचं उद्घाटन होणार असल्याची घोषणा राणे यांनी आज केलीय. दरम्यान, शिवसेनेकडून ७ ऑक्टोबरला चिपी विमानतळाचं उद्घाटन होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे या मुद्द्यावरुन शिवसेना विरुद्ध भाजप असं चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
चिपी विमानतळावरुन ९ ऑक्टोबर रोजी विमान वाहतूक सुरु होईल. नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत ९ ऑक्टोबरला दुपारी १२.३० वाजता सिंधुदुर्गात हा कार्यक्रम होणार आहे. त्यावेळी आपण स्वत: आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित असतील, अशी माहिती राणे यांनी दिलीय. सात वर्षापासून विमानतळ बांधून तयार होतं. आज सकाळी ज्योतिरादित्य शिंदे यांना भेटलो. त्यांची वेळ घेतली. त्यानंतर मी विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख जाहीर करत असल्याचं राणे म्हणाले. सिंधुदुर्ग, मुंबई आणि अन्य ठिकाणी विमान वाहतूक सुरु होईल असंही राणे म्हणाले.
दरम्यान, शिवसेनेकडून ७ ऑक्टोबर रोजी विमानतळाचं उद्घाटन होईल असं सांगण्यात आलंय. या बाबत विचारलं असता क्रेडीट घेण्याचा प्रश्न नाही. २०१४ पासून विमानतळ आम्ही बांधलं. आम्ही स्थानिक नाहीत का? त्यामुळे आम्ही विमानतळाचं उद्घाटन करणार असं राणे यांनी सांगितलं आहे.
उद्घाटनाला मुख्यमंत्री नसतील?
दरम्यान, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित असतील का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावेळी विमानतळाचे उद्घाटन संबंधित खात्याचे केंद्रीय मंत्री असलेले ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची गरज नसल्याचं राणे म्हणालेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना डावलून चिपी विमानतळाचं उद्घाटन होणार असल्याचं स्पष्ट झालंय. दरम्यान, खासदार विनायक राऊत यांनी याबाबत आपण पत्रव्यवहार केल्याचं म्हटलं होतं. त्याबाबत विचारलं असता फक्त पत्रव्यवहार करुन उद्घाटन होत नसतं, असा खोचक टोला राणेंनी लगावलाय.
राणेंचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या तसेच कोरोनाची तिसरी लाट या बाबी लक्षात घेता मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी गणेशोत्सव तसेच आगामी सण साधेपणाने साजरे करण्याची गरज व्यक्त केली आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेचा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. हे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती घालत आहे. यांना घरात बसायचं आहे, अशी घणाघाती टीका राणे यांनी केलीय. तसेच हिंदूंच्याच सणांना बंदी का ? असा रोखठोक सवालही त्यांनी ठाकरे सरकारला केलाय.
हिंदुंच्याच सणांनाच आवर का ? त्यांच्या जाहीर सभांना तसेच मोर्चांना का बंदी नाही ? घरांवर पाचशे लोक दगड मारायला एकत्र येतात. याला बंदी का नाही ? मुख्यमंत्री वागतात एक आणि बोलतात एक. जे दुसऱ्यांच्या घरावर दगड मारतात त्यांचा मुख्यमंत्री सत्कार करतात. हे कोणत्या विचारसरणीचे मुख्यमंत्री आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची ही भीती घालत आहेत. फक्त महाराष्ट्रातच तिसरी लाट आहे का ? बाकीच्या राज्यांत नाही का ? तिसऱ्या लाटेच्या नावाखाली यांना घरातच बसायचे आहे. एवढं करुनही १ लाख ५७ हजार लोकांचा मृत्यू झालाच की. राज्यात लस नाही, डॉक्टर्स नाही, वॉर्डबॉय नाही, नर्स नाही अशी परिस्थिती झाली आहे. वैद्यकीय सुविधांची दयनीय अवस्था आहे, असे नारायण राणे म्हणाले.