आरोग्य

राजेश टोपे म्हणतात, १५ दिवसांचा लॉकडाऊन शक्य!

टास्क फोर्सच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे ८ दिवस लॉकडाऊनचे संकेत

मुंबई/जालना : राज्यात कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत चालली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाऊन करणं हाच पर्याय असल्याचं काल सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. राज्यात लॉकडाऊन हा कमीत कमी १५ दिवसांचा असेल. लॉकडाऊनची सर्वांच्या मनाची तयारी झाली आहे. अंतिम निर्णय दोन ते तीन दिवसात मुख्यमंत्री घेतील, असं टोपे यांनी सांगितलं आहे. दरम्यान, वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी टास्क फोर्सची बैठक बोलावलीय. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यात 8 दिवसांच्या कडक लॉकडाऊनची गरज असल्याचं मत व्यक्त केलंय.

राजेश टोपे म्हणाले की, दोन तीन दिवसात मुख्यमंत्री लॉकडाऊनचा निर्णय घेतील. तसेच रेमडेसिवीरवर इंजेक्शनच्या नियंत्रणासाठी कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. खाजगी रुग्णालयांना आता रेमडेसिवीर जिल्हाधिकारी कार्यालयातून घ्यावं लागणार आहे, असंही ते म्हणाले.

कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता आणि रोज वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता राज्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता दाट झाली आहे. कारण आता खुद्द मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनला पर्याय नसल्याचं म्हटलं आहे. काल सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आता निर्णय घेण्याची वेळ आहे. राज्यात लॉकडाऊनला पर्याय नाही. १ रुग्ण २५ जणांना बाधित करतो, त्यामुळे ही चैन तोडणं गरजेचं आहे. तरुण, लहान मुलं बाधित होत आहेत, त्यामुळं एकमुखानं निर्णयाची वेळ आली आहे. यात राजकारण नको. केंद्राकडे ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरची मागणी केली आहे. आता लॅाकडाऊनशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही, असं ते उद्धव ठाकरे म्हणाले. सर्वांना एकमुखानं निर्णय घेऊन सर्वांनी जनजागृती केली पाहिजे. सर्वांच्या साथीची गरज आहे, असं आवाहन देखील त्यांनी केलं होतं.

मुख्यमंत्र्यांचे संकेत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत टास्क फोर्सची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठक सुरु आहे. कोरोनाबाबतचा आढावा या बैठकीत घेतला जात आहे. लसीकरण आणि लॉकडाऊनवर चर्चा बैठकीत केली जात आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन हवा, असं मत टास्क फोर्सच्या बैठकीत मांडलं. पण टास्क फोर्समधील तज्ज्ञांनी निदान १४ दिवसांचा लॉकडाऊन लागू झाला तर परिस्थिती नियंत्रणात येईल, असं मत मांडलं. त्यामुळे टास्क फोर्सचे तज्ज्ञ देखील लॉकडाऊनच्या बाजूने आहेत. याबाबत लवकरच मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

बेड्सची संख्या, ऑक्सिजन उपलब्धता आणि व्हेंटिलेटरची उपलब्धता या विषयावर टास्क फोर्सच्या बैठकीत तज्ज्ञांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे चिंता व्यक्त केली. आरोग्य यंत्रणेवर असलेला ताणही कमी झाला पाहिजे, असं मत डॉक्टर्सनी व्यक्त केलं. राज्यात 14 दिवसांचा कडक लॉकडाऊन असावा, असं मत डॉक्टर तात्याराव लहानेंनी व्यक्त केलंय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button