
बारामती : दिवाळी सुरू झाली आहे. काही लोक म्हणतात फटाके फुटणार. फटाके जरूर फोडा. पण धूर काढू नका, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला. कोरोना संपलेला नाही. त्यामुळे मी हे विधान करतोय, अशी सारवासारवही मुख्यमंत्र्यांनी करताच एकच हंशा पिकला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अटल इनक्युबेशन सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. याप्रसंगी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राज्यातील प्रमुख उद्योजकांची उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार टोलेबाजी केली. मला यायला अडचण होती. पण ती अडचणही सांगून टाकतो. दोन चार दिवसांपासून माझे पाय धरले. कोणी पाय धरावे एवढा मोठा मी झालो नाही. आपले आपलेच धरले. त्यामुळे चालायला आणि उभं राहायला त्रास झाला. पण मी कधीच डगमगत नाही, असं मुख्यमंत्र्यांनी म्हणताच एकच हंशा पिकला.
Inauguration of Incubation & Innovation Center | Baramati – LIVE https://t.co/tsUYHeGdW7
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 2, 2021
शरद पवारांसारखा तरणाबांड नेता आपल्यासोबत आहे. सुप्रिया तू खरं सांगितलं की खोटं… सहस्त्रचंद्रदर्शन… ज्याने विकासाचा सूर्य दाखवला… अजूनही थांबत नाही. पवारसाहेब नेतृत्व करत आहेत. महाराष्ट्राचं आणि या संस्थांचं. सर्व कुटुंबच तळमळीने काम करत आहे. कुटुंब रंगलं काव्यात तसं पवार कुटुंब एका ध्यासात रमलं आहे, अशी स्तुतीही त्यांनी केली.
किमान विघ्न तर आणू नका
राजकारणात टीकाकार असतात असलेच पाहिजे. आम्हीही इतके दिवस तुमचे टीकाकार आहोत. शिवसेना प्रमुख म्हणायचे, अरे शरदबाबू बारामतीत काय करतात ते जरा बघितलं पाहिजे. हे असे संबंध होते. राजकारणात पटत नाही म्हणून एखाद्याच्या कामात विघ्न आणणं योग्य नाही. पाठिंबा देता येत नाही तर किमान विघ्न आणू नये. पण काय करावं आपल्याकडे अनेक विघ्नसंतोषी लोकं आहेत, असा चिमटाही त्यांनी काढला.
नारायण राणेंना सणसणीत टोला
राजकारणात उबवणी केंद्र असायला पाहिजे. आम्हीही उबवणी केंद्रे निर्माण केली होती. आम्ही नको ती अंडी उबवली. आता त्याचं काय झालं ते तुम्ही पाहातच आहातच, असा टोला त्यांना नारायण राणे यांना नाव न घेता लगावला.
गाडीतून येताना अजितदादा सांगत होते पुण्यानंतर बारामती नंबर दोनचं केंद्र बनेल, मुख्यमंत्र्यांनी असं म्हणताच एकच हंशा पिकला. बारामती राजकारणाचं केंद्र आहेच. पण शिक्षणाचंही केंद्र होणार आहे. इथे सगळ्याच गोष्टी शिकवल्या जातात, असं त्यांनी म्हणताच एकच हंशा पिकला.