गुजरात सोडून अन्य राज्यातील पीडितांबाबत आपली काही जबाबदारी नाही का?
पृथ्वीराज चव्हाण यांचा मोदींना सवाल

मुंबई : तौक्ते चक्रीवादळाचा गुजरातच्या पश्चिम किनारपट्टीला जोरदार तडाखा बसल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वादळग्रस्त भागाची बुधवारी दुपारी पाहणी केली. या दौऱ्यानंतर झालेल्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधल्या वादळग्रस्त भागासाठी तब्बल १ हजार कोटींच्या तातडीच्या मदतनिधीची घोषणा केली आहे. तसेच, गुजरातमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि नुकसानीचा ताळेबंद लावण्यासाठी केंद्रीय पथक पाठवलं जाणार असल्याचं पंतप्रधान कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. यावरून काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
तौक्ते चक्रीवादळामुळे देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील पाच राज्ये प्रभावित झाली आहेत. पण प्रधानमंत्री मोदींनी फक्त गुजरात चा दौरा केला व त्यांना आर्थिक मदतीची घोषणा केली. हा भेदभाव का ? बाकीच्या राज्यातील पीडित जनतेच्या प्रति आपली कांही जबाबदारी नाही का? ते गुजरातचे पंतप्रधान असल्यासारखे का वागत आहेत? असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विटद्वारे केला आहे. दरम्यान, देशभरात तौते चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागात मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये तर जखमी झालेल्यांना ५० हजार रुपयांची मदत केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे.




