लॉकडाऊनला विरोध करणाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांचा जोरदार निशाणा

मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेला संबोधित करताना लॉकडाऊनला विरोधक करणाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. मास्क वापरावरुन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नाव न घेता त्यांनी टोला लगावला.
राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना मी मास्क वापरत नाही, असं म्हटलं होतं. यावरुन मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता टोला लगावला. मास्क न वापरणं यात काय शौर्य? असा टोला मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांचं नाव न घेता लगावला. काही दिवसांपूर्वी देखील मुख्यमंत्र्यांनी मास्क न वापरण्याच्या वक्तव्यावर राज ठाकरे यांना नमस्कार केला होता.
आनंद महिंद्रांना सडेतोड उत्तर
विरोधी पक्षांसोबत महिंद्रा ग्रुपचे संचालक आनंद महिंद्रा यांनी देखील लॉकडाऊनवर नाराजी व्यक्त केली होती. ट्विट करत आनंद महिंद्रा यांनी लॉकडाऊन न करता आरोग्य व्यवस्था वाढवा, अशी सूचना महिंद्रा यांनी केली होती. दरम्यान, आजच्या लाईव्हमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिंद्रा यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी, मी त्यांचं नाव घेणार नाही, पण एका उद्योगपतीने सांगितलं की लॉकडाऊन करायचाय, तर आरोग्य सुविधा वाढवा, असं म्हटलं आहे. आरोग्य सुविधा वाढवतच आहोत. मी बेड्स वाढवतो, सर्व वाढवतो, पण कृपा करून डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी यांचा महाराष्ट्रभर पुरवठा होईल, अशी काही तरी व्यवस्था करा. नुसतं फर्निचरचं दुकान म्हणजे आरोग्य सुविधा नाही, असा टोलाही त्यांनी नाव न घेता आनंद महिंद्रांना हाणलाय. व्हेंटिलेटर आल्यानंतर ते वापरणारेसुद्धा तज्ज्ञ लागतात. ऑक्सिजन किती प्रमाणात द्यायचा त्यासाठीही तज्ज्ञ लागतात. रेमडेसिवीर द्यायचं झालं तर ते कसं दिलं पाहिजे ते समजणारा डॉक्टर लागतो. हे तज्ज्ञ लोक आणि डॉक्टर्स कुठून आणायचे? ही परिस्थिती पाहिल्यास मला तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.
लॉकडाऊन लावायचा असल्यास आधी रोजगाराचे ५ हजार रुपये थेट खात्यात जमा करा, असं सांगणारे काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांनाही त्यांनी नाव न घेता सडेतोड उत्तर दिलंय. जे सांगतायत लॉकडाऊन केले तर आम्ही रस्त्यावर उतरू, मी सांगतो जरूर उतरा, उतरलंच पाहिजे. ते लॉकडाऊनच्या विरोधात नाही, तर लॉकडाऊन होऊ नये म्हणून कोरोनाच्या विरोधात तुम्ही रस्त्यावर उतरा, असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.