राजकारण

ममतादीदी झाशीच्या राणीसारख्या लढल्या : भुजबळ

नाशिक: पश्चिम बंगालमधील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विजयावरून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपवर टीका केली आहे. ‘मेरा बंगाल नहीं दूंगी’ म्हणत ममता बॅनर्जी झाशीच्या राणीसारख्या लढल्या, असं सांगतानाच बंगालच्या निकालानंतर देशात भाजपविरोधी लाट निर्माण झाली आहे, असा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे.

छगन भुजबळ यांनी मीडियाशी संवाद साधताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं तोंडभरून कौतुक केलं. ममता बॅनर्जी या झाशीच्या राणीप्रमाणे लढल्या. ‘मै अपनी झाशी नही दुंगी’ असं झाशीच्या राणी म्हणाल्या होत्या. त्याच प्रमाणे ममता दीदीही ‘मै अपना बंगाल नही दुंगी’ म्हणत लढल्या. तशी प्रतिज्ञाच त्यांनी केली होती. बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दिवसाआड सभा घेत होते. त्यांचे ८ ते १० मंत्री मतदारसंघात ठाण मांडून बसले होते. पण उपयोग झाला नाही, असा चिमटा भुजबळ यांनी काढला.

आसाम वगळता भाजपला कुठेच यश मिळाले नाही. भाजप विरोधात देशात प्रचंड लाट तयार झाली आहे, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीवरही भाष्य केलं. पंढरपूरचा निकाल गटतट आणि इतर स्थानिक राजकारणामुळे लागत आहे. त्यावरून देशाचा कल बांधता येत नाही, असंही ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button