Top Newsराजकारण

मुख्यमंत्री विठूरायासमोर नतमस्तक; विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

आम्हाला ते पूर्वीचे वारकऱ्यांनी तुडुंब भरलेले आनंदी पंढरपूर पहायचंय !

सोलापूर/पंढरपूर : आम्हाला आषाढी यात्रेत तुडुंब भरलेले पंढरपूर पाहायला मिळाले आहे. ते वातावरण आम्हाला परत पाहिजे. हे विठ्ठला… पांडुरंगा कोरोनाचं संकट लवकरात लवकर दूर कर…आम्हाला ते पूर्वीचे आषाढीतील वारकऱ्यांनी तुडुंब भरलेले पंढरपूर पहायचंय अशी हाक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंढरपुरात घातली.

आषाढी एकादशी पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय पूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या सुविद्य पत्नी रश्मी ठाकरे यांच्याहस्ते पार पडली. शासकीय पूजेनंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या त्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांचा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. याचवेळी मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले

सत्काराला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, मंदिरात आल्यानंतर फक्त विठ्ठल रुक्मिणी मूर्तीकडेच आपण पाहत असतो, परंतु मंदिरातील प्रत्येक खांब, प्रत्येक दगड काहीना काहीतरी बोलत असतो. आज मी परंपरेचा वृक्ष लावला. त्यांची पायेमुळे जगभरात आणखी घट्ट होतील असा विश्वास ही ठाकरे यांनी व्यक्त केला. याचवेळी मंदिर समितीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या प्रतिमांचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

दरम्यान, पहाटे सव्वा दोन वाजल्यापासून या महापुजेला सुरुवात झाली होती. दरवेळेस मुख्यमंत्र्यांसोबत एका वारकऱ्याला या महापुजेचा मान मिळतो. मात्र यंदा वारीच नसल्याने हा मान विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील विणेकरी मूळचे वर्धा येथील केशव शिवदास कोलते यांना हा मान मिळाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे यांच्या समवेत वर्धा येथील केशव शिवदास कोलते व त्यांची पत्नी इंदूबाई केशव कोलते यांना यंदा विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मान मिळाला. आजच्या या महापुजेला मुख्यमंत्र्यांसोबतच सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे देखील उपस्थित होते. तसेच पर्यावरण मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे, शिवसेना पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर हे देखील यावेळी मंदिरात हजर होते.

आषाढी एकादशीच्या महापूजेनिमित्त संपूर्ण मंदिर फुलांनी सजविण्यात आले होते. तसेच मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. विद्युत रोषणाईने विठ्ठल मंदिर परिसर उजळून निघाले होते. यंदा आषाढी एकादशीची महापूजा ही वारकऱ्यांविनाच पार पडली. खरं तर गेली अनेक शतकं वारीची परंपरा मात्र कोरोनाचं संकटामुळे मागील दोन वर्षापासून ही परंपरा खंडित झाली. लाखो वारकऱ्यांच्या उपस्थित येणाऱ्या माऊलींच्या पादुका यंदा राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसमधून पंढरपुरात दाखल झाल्या. यावेळी मोजके वारकरी या पालख्यांसोबत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button