Top Newsस्पोर्ट्स

आयपीएल विजेतेपदाचा चेन्नईचा ‘चौकार’

दुबई : इंडियन प्रिमीयर लीग अर्थात आयपीएल या जगप्रसिद्ध क्रिकेट लीगच्या १४ व्य परवाच्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपरकिंग्स हे संघ आमने-सामने होते. काही ओव्हर्स अगदी सामना चुरशीचा होईल असं वाटतं असतानाच चेन्नईच्या गोलंदाजानी दमदार कमबॅक करत सामना एकहाती जिंकला. चेन्नईने ठेवलेल्या १९३ धावांचे आव्हान पूर्ण करण्यासाठी केकेआरने सुरुवात तर चांगली केली होती. सलामीवीर गिल आणि अय्यर यांनी दमदार सुरुवात केली खरी, पण ९१ धावांवर अय्यरची विकेट पडली आणि संघाला उतरती कळाच लागली. शार्दूलने एका षटकात अय्यर आणि राणाची विकेट घेतली आणि त्यानंतर संघातील सर्व खेळाडू एकामागोमाग एक बाद होत गेले. ज्यानंतर चेन्नईने अप्रतिम गोलंदाजीच्या जीवावर २७ धावांनी सामना जिंकला. या विजयानंतर धोनीची पत्नी साक्षी व मुलगी जिवा यांनी मैदानावर धाव घेतली. साक्षीनं धोनीला मिठी मारून तिचा आनंद व्यक्त केला.

चेन्नई सुपर किंग्स कधी, केव्हा व कसे कमबॅक करतील याचा नेम नाही. आयपीएल फायनलमध्ये १९०+ लक्ष्याचा दोनवेळा यशस्वी पाठलाग करणारा कोलकाता नाइट रायडर्स यंदाही तो करिष्मा करेल असे वाटत होते. वेंकटेश अय्यर व शुबमन गिल यांनी सुरुवातही तशी दणक्यात करून दिली, परंतु शार्दूल ठाकूरच्या एका षटकानं सामना फिरवला अन् त्यानंतर चेन्नईनं सॉलिड कमबॅक केले. बिनबाद ९१ अशा मजबूत स्थितीत असलेल्या कोलकाताचा डाव गडगडला. चेन्नई सुपर किंग्सनं चौथ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली. चेन्नई सुपर किंग्सनं आयपीएल स्पर्धा जिंकून हा जेतेपदाचा चौकार खेचला.

ऋतुराज गायकवाड व फॅफ ड्यू प्लेसिस ही जोडी यंदाच्या आयपीएलमधील सर्वात यशस्वी सलामीवीर जोडी ठरली. त्यांनी ७५२ हून अधिक धावा केल्या. ऋतुराजनं वैयक्तित ३२ धावा करताना फॅफसह पहिल्या विकेटसाठी ६१ धावा जोडल्या. फॅफला तिसऱ्या षटकात दिनेश कार्तिकनं ( यष्टिचीत) जीवदान दिलं. त्यानंतर रॉबीन उथप्पानं १५ चेंडूंत ३ खणखणीत षटकारांसह ३१ धावा कुटल्या. मोईन अली अली २० चेंडूंत ३७ धावांवर नाबाद राहिला. फॅफनं ५९ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ८६ धावा केल्या आणि चेन्नईला २० षटकांत ३ बाद १९२ धावा उभारून दिल्या. कोलकाताचा ल्युकी फर्ग्युसननं ५६ धावा दिल्या. सुनील नरीननं २६ धावांत २ विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरात शुबमन गिल व वेंकटेश अय्यर यांनीही धुरळा उडवला. महेंद्रसिंग धोनीकडून क्वचितच चूक होताना दिसते अन् ती आजच्याच सामन्यात झाली. वेंकटेश शून्यावर असताना धोनीकडून त्याचा झेल सुटला. दीपक चहर, शार्दूल ठाकूर, जोश हेझलवूड यांचे ही जोडी तोडण्याचे सारे डावपेच फसले. वेंकटेशनं ३१ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. रवींद्र जडेजाच्या त्या षटकात गिलनं उत्तुंग फटका टोलावला अन् अंबाती रायुडूनं तो चेंडू टिपला. चेन्नईच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला, परंतु हवेत झेपावलेला चेंडू स्पायडर कॅमेराच्या तारेवर आदळल्याचे स्पष्ट दिसले अन् गिलला जीवदान मिळाले.

११ व्या षटकात कोलकाताच्या डावाला कलाटणी मिळाली. शार्दूल ठाकूर पुन्हा एकदा चेन्नईचा संकटमोचक ठरला. त्यानं ११ व्या षटकात वेंकटेश ( ५०) व नितीश राणा ( ०) यांना माघारी पाठवले. पुढच्याच षटकात जोश हेझलवूडनं कोलकाताला आणखी एक धक्का देताना सुनील नरीनची ( २) विकेट काढली. दीपक चहरनं १४ व्या षटकात कोलकाताला मोठा धक्का दिला. चहरच्या फुलटॉसवर पहिल्या स्टम्पवर लेगसाईटला फटका मारण्याच्या प्रयत्नात गिल पायचीत झाला. तो ५१ धावांवर माघारी परतला. दिनेश कार्तिकनं पहिल्याच चेंडूवर पुल शॉट मारून षटकार खेचला, परंतु त्याला मोठी खेळी करता आली नाही. रवींद्र जडेजाच्या चेंडूवर फटका मारण्याच्या प्रयत्नात तो रायुडीच्या हाती झेल देऊन परतला. शाकिब अल हसनलाही जडेजानं पायचीत केलं. बिनबाद ९१ वरून कोलकाताची अवस्था ६ बाद १२० अशी झाली.

क्षेत्ररक्षणात दुखापत झालेला राहुल त्रिपाठी ८व्या क्रमांकावर फलंदाजीला आला, परंतु शार्दूलनं त्याची विकेट घेतली. दीपक चहरनं ३१ धावांत १, रवींद्र जडेजानं ३७ चेंडूंत २ विकेट्स घेतल्या. कोलकाताचा कर्णधार इयॉन मॉर्गनही ( ४) जोश हेझलवूडच्या गोलंदाजीवर बाद झाला. दीपक चहरनं सीमारेषेवर अफलातून झेल टिपला. आता कोलकाताचे कमबॅक अशक्यच होते आणि चेन्नईच्या विजयाची औपचारिकता पूर्ण व्हायची बाकी होती. चेन्नईनं हा सामना २७ जिंकला. कोलकाताला ९ बाद १६५ धावा करता आल्या. शार्दूलनं ३८ धावांत ३ विकेट्स घेतल्या. शार्दूलनं त्याच्या चौथ्या षटकात १७ धावा दिल्या. २०१०, २०११, २०१८नंतर चेन्नईनं चौथ्यांदा जेतेपद नावावर केलं.

जेतेपदाचा खरा हक्क कोलकाताचा होता; धोनीने माने जिंकली

कोलकातावर २७ धावांनी विजय मिळवताना चेन्नईनं चौथं जेतेपद नावावर केलं. बिनबाद ९१ वरून कोलकाताचे ९ फलंदाज ७४ धावांत माघारी परतले. तरीही या जेतेपदासाठी कोलकाता खऱे पात्र असल्याचे मत महेंद्रसिंग धोनीनं सामन्यानंतर व्यक्त केलं.

चेन्नईच्या विजयाबद्दल बोलण्याआधी मी कोलकाता नाइट रायडर्सबद्दल बोलेन. इथपर्यंत मजल मारणे हे त्यांच्यासाठी दमदार पुनरागमनासारखेच होते आणि ही गोष्ट अत्यंत आव्हानात्मक होती. यंदाच्या आयपीएलमध्ये जेतेपदासाठी कोण खरं पात्र असेल तर तो कोलकाताचा संघ. याचे श्रेय हे प्रशिक्षक, संघ आणि सपोर्ट् स्टाफला द्यायला हवं. मधल्या काळात मिळालेला ब्रेक अत्यंत फायदेशीर ठरला. चेन्नईबद्दल सांगायचे तर आम्ही सातत्यपूर्ण कामगिरी करत एकामागून एक विजय मिळवले. प्रत्येक फायनल ही स्पेशल असते. तुम्ही आकडेवारी पाहाल, तर फायनलमध्ये सर्वाधिक पराभवाचा विक्रम आमच्या नावावर आहे. पण, मागच्या पर्वातील अपयशानंतरचा हा विजय अत्यंत महत्त्वाचा आहे, असे धोनी म्हणाला.

चेन्नईनं जेतेपदासह जिंकले कोट्यवधी रुपये

कोणाला किती मिळाले बक्षीस…

Emerging Player Award ऋतुराज गायकवाड – १० लाख
IPL 2020 Fair Play Award राजस्थान रॉयल्स – १० लाख
Game Changer of the Season हर्षल पटेल – १० लाख
Super Striker of the Season शिमरोन हेटमायर – १० लाख
सर्वाधिक षटकार – लोकेश राहुल – १० लाख
Power Player of the Season – वेंकटेश अय्यर – १० लाख
Purple Cap – हर्षल पटेल – १० लाख
Orange Cap – ऋतुराज गायकवाड – १० लाख
Most Valuable Player – हर्षल पटेल – १० लाख
विजेता – चेन्नई सुपर किंग्स – २० कोटी
उपविजेता – कोलकाता नाइट रायडर्स – १२.५ कोटी
तिसरा क्रमांक – दिल्ली कॅपिटल्स – ८.७५ कोटी
चौथा क्रमांक – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर – ८.७५ कोटी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button