Top Newsराजकारण

राज्यसभेत महिला सदस्यांना धक्काबुक्की ही ‘गुजरात मॉडेल’ची प्रतिकृती : मलिक

मुंबई : राज्यसभेत काल जे घडले ते अलोकतांत्रिक गुजरात मॉडेलची प्रतिकृती होती असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विटच्या माध्यमातून केला आहे.

गुजरातमधील भाजप सरकार विधानसभेत विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी बळाचा वापर करते आणि आता भाजपच्या नेतृत्वाखालील हे केंद्रसरकार संसदेतही तेच करत आहे असा प्रहारही नवाब मलिक यांनी केला आहे. दरम्यान #MurderOfDemocracy (‘लोकशाहीची हत्या’) हा हॅशटॅग वापरत नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

संसदेत महिला सदस्यांना पुरुष मार्शलकडून धक्काबुक्की करण्यात आली. त्यावर राष्ट्रपती आणि लोकसभा अध्यक्षांनी चिंता व्यक्त केली आहे. मात्र, राष्ट्रपती आणि लोकसभा अध्यक्षांनी याबाबत केंद्राला विचारणा करायला हवी होती, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रवक्ते मलिक यांनी व्यक्त केली आहे.

संसदेचे कामकाज दोन दिवसाअगोदर स्थगित करण्यात आले. याचा अर्थ केंद्रसरकार जनतेच्या प्रश्नापासून पळ काढत होते. पेगासस प्रकरण, शेतीचा कायदा असेल, जातनिहाय जनगणना असेल या सर्व प्रश्नांवर चर्चा न करता किंवा त्याचे उत्तर न देता संसदेचे कामकाज स्थगित करण्यात आले. याचा अर्थ संसदेत कोणतेच उत्तर द्यायचे नाही असे धोरण सरकारचे होते, असा दावाही त्यांनी केला.

संसदेत महिला सदस्यांसोबत पुरुष मार्शलने धक्काबुक्की केली. बळाचा वापर करण्यात आला. ही घटना अशोभनीय आहे, असं मलिक म्हणाले. महिला सदस्यांचा अपमान करण्यात आला. लोकशाहीत अशाप्रकारची घटना योग्य नाही. यावर लोकसभा अध्यक्ष व राष्ट्रपतींनी चिंता व्यक्त केली. परंतु त्यांनी सरळ- सरळ केंद्रसरकारला याप्रकरणी विचारणा करण्याची गरज होती. मात्र त्यांनी राजकीय दबावामुळे तसे केले नसावे, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button