स्वबळावर निवडणूक लढण्याबाबत काँग्रेसच्या वरिष्ठांशी चर्चा नाही : बाळासाहेब थोरात

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना-राष्ट्रवादीसोबतच्या युतीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर, आता काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपली भूमिका मांडली. “भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे यासाठी आम्ही महाविकास आघाडीत एकत्र आहोत. जनतेसाठी काम करतो हे समोर ठेवून पुढे काम करू” असं बाळासाहेब थोरात म्हणाले. दरम्यान, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी काल बैठक घेतली. मात्र कालच्या बैठकीत स्वबळावर निवडणूक लढण्याबाबत चर्चा झाली नाही. विधानसभा निवडणुकीला साडे तीन वर्षे आहेत. जिथे पालकमंत्री आहेत, संपर्क मंत्री आहेत तिथे फिरलं पाहिजे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये आपल्या पक्षासाठी लक्ष केंद्रित करावे, अशा सूचना दिल्याचं थोरात म्हणाले.
भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षातील नेते स्वबळाची भाषा करत आहेत. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष राज्यातील प्रमुख आणि मोठे पक्ष आहेत. आम्ही दोघांनीही स्वबळाची भाषा केली नाही. त्यामुळे भविष्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आले आणि निवडणूक लढले तर राज्यात चमत्कार होईल, असं संजय राऊत म्हणाले होते. त्यावर बाळासाहेब थोरात यांनी ही प्रतिक्रिया दिली.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांनी काल बैठक घेतली. यामध्ये काँग्रेसचे सर्व मंत्री उपस्थित होते. सरकारमध्ये आमचं काम कसं सुरू त्याचा आढावा घेतला. पालकमंत्री म्हणून काम चांगलं झालं आहे. संपर्कमंत्री यांनी काम वाढवलं पाहिजे ही सूचना दिली. काँग्रेसचे मंत्री म्हणून आमच्यावर जबाबदारी आहे, काही विषय समजून घेण्याचा प्रयत्न केला, असं थोरातांनी सांगितलं.
सरकार तीन पक्षांचं आहे. जे प्रश्न निर्माण झाले त्याचा मार्ग काढतो, प्रश्न सुटलेले दिसतात. पदोन्नती आरक्षणाबाबत न्यायलयात प्रकरण आहे. त्यानुसार कारवाई होणार आहे. गरीब घटकाला न्याय मिळाला पाहिजे हा सरकारचा हेतू आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. संजय राऊत यांनी काय म्हणावं हा त्यांचा प्रश्न आहे. त्याबाबत मी भाष्य करणे योग्य नाही, असंही थोरातांनी सांगितलं.
विधानसभा अध्यक्ष निवडणूक या अधिवेशनात होईल, कोण असेल याबाबत नाव तेव्हा ठरेल, असं थोरात म्हणाले. नाना पटोले यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याने, काँग्रेसकडून विधानसभा अध्यक्षपदी कोणाला संधी दिली जाते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



