Top Newsराजकारण

परमबीर सिंग यांच्याविरोधात ‘लूक आऊट नोटीस’ जारी

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि गृहरक्षक दलाचे महासंचालक परबीर सिंग यांना मोठा झटका बसला आहे. खंडणी प्रकरणी परमबीर सिंग आणि मुंबई पोलीस दलातील एक वरिष्ठ डीसीपी दर्जाचे आयपीएस अधिकारी यांच्याविरुद्ध लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. ही प्रक्रिया पाच दिवसांपूर्वी सुरू झाली होती. इतर अनेक पोलीस अधिकाऱ्यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे.

ठाण्यात काही दिवसांपूर्वी खंडणीच्या आरोपाखाली परमबीर सिंह यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. यामध्ये एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा हे देखील सहआरोपी असल्याचं नोंद करण्यात आली होती. तसंच पोलीस उपायुक्त दीपक देवराज, सहाय्यक पोलीस आयुक्त एन. टी. कदम आणि निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्यासह आणखी दोन कनिष्ठ स्तरीय अधिकाऱ्यांसह एकूण २८ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला होता. केतन तन्ना या बांधकाम व्यावसायिकाच्या तक्रारीवर आयपीसी कलम ३२४ (हल्ला), ३८४ (खंडणी), ३९२ (दरोडा) आणि ५०६ (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

परमबीर सिंग जानेवारी २०१८ ते फेब्रुवारी २०१९ दरम्यान ठाणे पोलीस आयुक्त असताना आरोपींनी त्यांना खंडणीविरोधी कक्षाच्या कार्यालयात बोलावून आणि गंभीर गुन्हेगारी प्रकरणात त्यांना अटक करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून १.२५ कोटी रुपये उकळले. त्यांनी त्याचा मित्र आणि कथित सट्टेबाज सोनू जालान यांच्याकडूनही अशाच प्रकारे तीन कोटी रुपयांची उकळले, असा आरोप त्यांनी केला.

एसआयटीची नियुक्ती

श्यामसुंदर अग्रवाल नावाचा एक व्यापारी आणि बिल्डरच्या तक्रारीवरुन मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर सिंग आणि इतर अनेक अधिकारी त्यांच्यावर दाखल केलेले खटले मागे घेण्यासाठी त्यांच्या १५ कोटींची खंडणी मागितल्याचा त्यांनी आरोप केला आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमण्यात आली आहे. एसआयटीचे नेतृत्व डीसीपी दर्जाचे अधिकारी करत आहेत तर तपास अधिकारी (आयओ) एसपी रँकचा असेल. सिंग यांच्यावर भादंविच्या कलम ३८७, ३८९,४०३, ४०९, ४२० आणि ४२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button