
मुंबई : सध्या केंद्रीय ईडी, सीबीआय आदी तपास यंत्रणांच्या कारवाईवरुन शिवसेना आणि भाजप नेत्यांमधील वाद शिगेला पोहोचला आहे. अशातच आता शिवसेनेकडून राष्ट्रीय स्तरावर भाजपविरोधी मोट बांधण्याच्या हालचाली सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची आज भेट घेणार आहेत. दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी के. चंद्रशेखर राव यांना फोन करुन मोदींविरोधातील लढ्यातील पाठिंबा दिला होता. उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर चंद्रशेखर राव हे शरद पवारांची देखील भेट घेतील.
विरोधी पक्षाकडून केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून सरकार पाडण्याचे प्रयत्न होत असल्याचाही आरोप त्यांनी केला. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि झारखंडमधील सरकार पाडण्याचा कारस्थान सुरू असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. त्यातच आता शिवसेनेकडून केंद्रीय पातळीवर भाजपविरोधात लॉबी तयार करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्यातील भेट ही त्यानिमित्तानेच होणार असल्याचे कळते.
राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतरच दुसऱ्यांदा भाजपविरोधात आता मुख्यमंत्रीही सक्रीय झाल्याचे दिसते आहे. त्याचाच भाग म्हणजे उद्धव ठाकरेंनी केसीआर यांना केलेला फोन हे समजले जात आहे. या फोनकॉलचे अनेक अर्थ काढण्यात येत आहेत. केसीआर यांच्याकडून मोदी सरकारविरोधात आंदोलन पुकारण्यात येणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे या नव्या राजकीय समीकरणाला दिशा मिळणार का ? असाही अर्थ यानिमित्ताने लावला जात आहे. मोदी सरकारच्या विरोधात तसेच देशाच्या संघराज्य पद्धतीच्या संरक्षणासाठी केंद्राविरोधात केसीआर हे आंदोलन करणार आहेत. या लढ्याला पाठिंबा देण्यासाठीच उद्धव ठाकरेंनी कॉल केल्याचे कळते. त्यामुळेच आजच्या भेटीत नेमके काय घडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
भाजपविरोधात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जोरदार आघाडी निर्माण करण्याच्या मुद्द्यावर के चंद्रशेखर राव यांच्याकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच केंद्रावर टीका केली जात आहे. त्यामुळेच राव यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचे याआधी सांगितले होते. या प्रस्तावाला आता उद्धव ठाकरेंनीही मंजूरी दिली आहे. त्यामुळे २०२४ च्या निवडणुका भाजपविरोधात एकत्र लढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शिवसेनेकडूनही सांगण्यात आल्याचे कळते.
भाजपविरोधी विरोधी पक्षांची मोट उभारण्याचे काम सध्या के चंद्रशेखर राव करत आहेत. मंगळवारी राव यांनी माजी मुख्यमंत्री एच डी . देवेगौडा यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. देवेगौडा यांनी राव यांना पाठिंबा दिला आहे असे सांगण्यात येत आहे. आता चंद्रशेखर राव मुंबई दौर्यात उद्धव ठाकरे, शरद पवार यांची भेट घेणार आहे. यावेळी २०२४ च्या रणनीतीबद्दलही दोघांमध्ये चर्चा होणार आहे. विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी यापूर्वी राव यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन, केरळचे मुख्यमंत्री पी विजयन आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी याद यांच्यासह अनेक नेत्यांची भेट घेतली आहे. पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनीही हैद्राबमध्ये जआणार असल्याचे सांगितले आहे. ममता बॅनर्जीही बिगर भाजप शासित राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत.