Top Newsराजकारण

चंद्रकांतदादांना चार दिवस दिल्लीत थांबूनही मोदी, शहांनी भेट नाकारली !

नवी दिल्ली : भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील चार दिवस दिल्लीत होते. चंद्रकांतदादा या दिल्ली भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार होते. यावेळी ते मनसे युतीबाबतही चर्चा करणार होते. पण चार दिवस दिल्लीत राहूनही त्यांची या दोन्ही नेत्यांशी भेट झाली नाही. त्यामुळे मनसेबाबत युतीचा निर्णयही लटकला असल्याचं सांगितलं जात आहे.

चंद्रकांत पाटील यांनी दिल्लीत जाण्यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी मनसेच्या परप्रांतियांबाबतच्या भूमिकेवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी चंद्रकांतदादा दिल्लीला रवाना झाले. दिल्लीत जाण्यापूर्वी त्यांनी मीडियाशी संवाद साधला होता. मी चार दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर जात आहे. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. त्यांनी भेट दिल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती, राज्यातील संघटनात्मक कामं यावर चर्चा होईल. यावेळी राज यांच्यासोबत झालेली भेट आणि भेटीतील चर्चेचा तपशीलही त्यांना देण्यात येईल, असं चंद्रकांतदादांनी स्पष्ट केलं होतं.

दरम्यान, पाटील यांनी दिल्लीत आल्यानंतर त्यांनी भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली. त्यानंतर संघटन महामंत्री बी.एल. संतोष यांची भेट घेतली. अमित शहा यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भेट दिली. दोघांमध्ये दीड तास चर्चा झाली. या भेटीत राज्यातील विविध विषयांवर चर्चा झाली. चंद्रकातदादांनी शहा यांची भेट मिळावी म्हणून बराच प्रयत्न केला. मात्र, शहा यांनी पाटील यांची भेट नाकारल्याचं सूत्रांनी सांगितलं. शहा-पाटील यांच्या भेटीत प्रामुख्याने मनसे युतीवर चर्चा होणार असल्याने ही शहा यांनी पाटील यांची भेट नाकारल्याचं सांगितलं जातं.

दरम्यान, संसदेचं अधिवेशन सुरू आहे. संसदेत अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणार आहे. त्यामुळे शहा व्यस्त होते. त्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही, असं चंद्रकांतदादांनी स्पष्ट केलं. शहा यांनी भेट नाकारल्याचं वृत्तही त्यांनी फेटाळून लावलं. संसदेच्या कामामुळे ही भेट झाली नसल्याचं त्यांनी सांगितलं.

हा रुटीन दौरा होता. आम्ही वारंवार दिल्लीत जातो. नेक्स्ट जनरेशन उभी केली पाहिजे या हेतूने आमचं काम चालतं. त्यामुळे राम शिंदे, संजय कुंटे, चंद्रशेखर बावनकुळे आदी सर्वांना घेऊन आम्ही दिल्लीत गेलो. मंत्र्यांना भेटणं आणि खातं समजून घेण्यासाठी हा दौरा होता. मोदी-शहांची भेट सोडली तर सर्वांची भेट झाली. अधिवेशनामुळे मोदी आणि शहांची भेट होऊ शकली नाही, असं सांगतानाच या दौऱ्याचा आणि राज्यातील सत्तांतराचा काहीच संबंध नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button