मुंबई : मला माजी मंत्री म्हणू नका, आगामी दोन तीन दिवसांत कळेल असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यात खळबळ उडवून दिली. त्यांच्या या वक्तव्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना तुम्ही पुढील पंचवीस वर्षे माजी मंत्रीच राहणार असं थेट फोन करुन सांगितलं आहे. चेंबूरमध्ये बोलत असताना संजय राऊत यांनी ही महिती दिली आहे. संजय राऊतांनी फोन करुनच चंद्रकांत पाटलांना त्यांच्या कोड्यात टाकणाऱ्या वक्तव्याला उत्तर दिल्यामुळे एकच चर्चा रंगली आहे.
संजय राऊत आज चेंबूरमध्ये शिवसेनेच्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेची जडणघडण तसेच पक्षाचा संघर्ष याविषयी सविस्तर भाष्य केले. तसेच आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी तयार राहण्याचेही कार्यकर्त्यांना आवाहन केले. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटलांनी केलेल्या वक्तव्याचा राऊतांनी समाचार घेतला. मला माजी मंत्री म्हणू नका, दोन ते तीन दिवसांत कळेलच असे चंद्रकांत पाटील पुण्यात बोलताना म्हणाले होते. त्यानंतर एक वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या. चंद्रकांत पाटलांच्या याच वक्तव्याबाबत बोलताना “मी स्वत: पाटलांना फोन करुन पुढचे पंचवीस वर्षे तुम्ही माजी मंत्रीच असाल असे चंद्रकांत पाटलांना सांगितले,” असे राऊत म्हणाले. तसेच पुढे बोलताना आम्हाला कुणाच्याही कुबड्यांची गरज नाही. स्वबळावर सत्ता हवी तर शिवसेनेला १५० जागा हव्यात, असेही राऊत म्हणाले.
“चेंबूर असेल तसेच इतर ठिकाणं शिवसेनेचे बालेकिल्ले आहेत. मध्यंतरी माझी आणि राहुल गांधी यांची भेट झाली. या भेटीची खूप चर्चा झाली. राहुल गांधी यांनी शिवसेनेच्या रचनेविषयी, कार्याविषयी समजून घेतलं. त्यांनी मला एका वाक्यात शिवसेना काय आहे ? हे विचारलं. त्याला उत्तर म्हणून आम्ही असे आहोत की एकदा रस्त्यावर उतरलो की विचार करत नाही. फटे लेकीन हटे नही असं आमचं असतं. आम्ही कुणाच्या पाठीत वार करत नाही,” असं राऊत म्हणाले. तसेच शिवसेना असंख्य वार आणि घाव घेऊन इथपर्यंत आली आहे. ही शिवसेना त्यागातून संघर्षातून समोर आलेली आहे. जी आंदोलनं आपण केली त्याच पुण्याईवर आज शिवसेना उभी आहे, याची आठवणही राऊत यांनी कार्यकर्त्यांना करुन दिली.