परमबीर सिंग यांच्यावर गुन्हा दाखल; ‘अॅट्रॉसिटी’सह विविध २२ कलमान्वये गुन्हे
अकोला : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध अॅट्रॉसिटी अॅक्टसह विविध २२ कलमान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अकोल्यातील पोलीस अधिकारी भीमराज घाडगे यांनी ही तक्रार केली आहे.
परमबीर सिंग यांच्या पत्नीचे इंडिया बुल्समध्ये कार्यालय आहे. तिथे हजारो कोटी गुंतवल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्यांचा मुलगा रोहन हा सिंगापूरमध्ये एक मोठा व्यवसाय चालवतो. तिथे देखील भ्रष्टाचाराचे पैसे गुतंवण्यात आले आहेत, असा आरोप भीमराज घाडगे यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. त्या रकमेची वेगवेगळ्या माध्यमातून गुंतवणूक केली. परमबीर सिंग यांच्या कुटुंबियांनी वेगवेगळ्या व्यवसायात त्या पैशांची गुंतवणूक केली, असा धक्कादायक आरोप अकोल्याच्या पोलीस निरीक्षक भीमराज घाडगे यांनी केला आहे.
विशेष म्हणजे या पोलीस अधिकाऱ्याने काही दिवसांपूर्वी याबाबतचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनाही पत्र पाठवले होते. त्यानंतर काल रात्री उशिरा याबाबत अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर सिंग यांच्याविरोधात दाखल झालेला हा पहिला गुन्हा आहे.
त्यासोबतच परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलीस अधिकाऱ्यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचेही भीमराज घाडगे यांनी यात म्हटलं आहे. यामध्ये पराग मणेरे, संजय शिंदे, सुनील भारद्वाज, विजय फुलकर या चार पोलीस उपायुक्तांसह डझनभर पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे, असा दावा भीमराज घाडगे केला आहे. तसेच परमबीर सिंग यांच्याविरुद्ध आणखी काही गुन्हे दाखल होणार असल्याचे बोललं जात आहे. त्यात भ्रष्टाचारासह जातीवाचक शिवीगाळ आणि अन्य काही गंभीर प्रकरणांचा समावेश आहे, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे.
या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी परमबीर सिंग यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटी कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल करून हे प्रकरण ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकरणाचा संपूर्ण तपास ठाणे पोलिसांकडून करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.