Top Newsराजकारण

देशात सर्वांना मोफत लस, दिवाळीपर्यंत ८० कोटी जनतेला धान्यही मोफत !

पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशाला मार्गदर्शन करताना येत्या २१ जूनपासून देशातील १८ वर्षावरील नागरिकांना मोफत लस देण्यात येईल. केंद्र सरकार लस खरेदी करुन ती राज्यांना मोफत पुरवली जाईल, स्पष्ट केले. याशिवाय पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेनुसार ८० कोटी नागरिकांना दिवाळीपर्यंत मोफत धान्य पुरवणार असल्याचेही मोदींनी सांगितले.

केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणावर विरोधकांकडून सातत्याने टीका होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही महत्त्वाची घोषणा केली. देशात लसीकरण कार्यक्रम सुरू झाल्यानंतर केंद्र सरकारने केवळ कोविड योद्धे आणि ४५ वर्षांपुढील नागरिकांच्या मोफत लसीकरणाची जबाबदारी घेतली होती. तर राज्यांनी १८ ते ४४ वर्ष वयोगटातील लोकांच्या लसीकरणाची जबाबदारी घेतली होती. मात्र, आता १८ वर्षांपुढील सर्वांचं लसीकरण केंद्र सरकार मोफत करणार आहे. १८ वर्षांपुढील सर्वांच्या लसीकरणासाठी लागणाऱ्या लसींचा साठा केंद्र सरकार मोफत करणार आहे.

मोदी म्हणाले की, भारतात गेल्या १०० वर्षात अशी महामारी आली नव्हती. या महामारीच्या संकटाचा सामना करतानाच भारताने गेल्या एका वर्षात दोन मेड इन इंडिया व्हॅक्सिन बनवून दाखवल्या आहेत, असं सांगतानाच आता लसीकरणाची १०० टक्के जबाबदारी केंद्र सरकारची असेल. २१ जूनपासून १८ वर्षावरील सर्वांना केंद्र सरकार मोफत लस देईल. राज्य सरकारला एक पैसाही खर्च करण्याची गरज राहणार नाही, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

देशाने कोरोना संकटाचा अनेक आघाड्यांवर सामना केला आहे. गेल्या दीड वर्षात आपण हेल्थ केअर स्ट्रक्चर वाढवण्यात आले आहे. मेडिकल ऑक्सिजनची या देशात कधीच एवढी कमतरता जाणवली नव्हती. त्यासाठी सैन्य दलाच्या तिन्ही तुकड्यांना कामाला लावण्यात आल्या. जगातील कानाकोपऱ्यातून जे काही आणणं शक्य होईल ते आपण आणून या संकटाचा सामना केला, असं मोदी म्हणाले.

खासगी रुग्णालयात १५० रुपयांत लस

येत्या २१ जूनपासून १८ वर्षावरील सर्वांना मोफत लस देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यांना एक पैसाही खर्च करावा लागणार नाही. सर्वांना मोफत लस देण्याची जबाबदारी ही केंद्र सरकारची आहे. भारतात सर्वांना मोफत लस दिली जाईल. ज्यांना मोफत लस नको असेल, खासगी रुग्णालयात जाऊन लस घेणार असतील तर त्यांना २५ टक्के लसी उपलब्ध असतील. खासगी रुग्णालयात १५० रुपये भरून लस घेता येईल, असं मोदींनी स्पष्ट केलं.

…तर १०० टक्के लसीकरणासाठी ४० वर्षे लागली असती

मोदी म्हणाले, जगात लसीची मागणी होत आहे. जर आज भारतात लशींचं उत्पादन झालं नसतं, तर काय परिस्थिती निर्माण झाली असती. मागचा इतिहास बघितला, तर लक्षात येतं की, भारताला दशकं लागायची. पोलिओसह अनेक लशींसाठी देशवासियांना वाट बघावी लागली. पण, २०१४ मध्ये भारतात लसीकरणाचा वेग ६० टक्केच होता. उत्पादनाचं प्रमाण खूप कमी होतं. हे आमच्यासाठी खूप चिंतेची गोष्ट होती. त्याच वेगानं जर लसीकरण झालं असतं, देशाला ४० वर्षे लागले असते. पण, यासाठी सरकारनं मिशन इंद्रधनुष्य सुरू केलं. लस तयार केली जाईल आणि ज्याला गरज आहे. त्याला दिली जाईल, केवळ सहा वर्षात लसीकरणाचा वेग ६० टक्क्यांवरून ९० टक्के झालं. सरकारने लसीकरणाचा वेग वाढवलाच, पण त्याचा विस्तारही केला.

देशातून करोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. मात्र, पुन्हा तिसरी लाट येणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे लशीच्या तुटवड्यावरून बहुतांश राज्यांमध्ये ओरड होत आहे. अनेक राज्यांनी जागतिक पातळीवर निविदा काढल्या आहेत. मात्र, या निविदांना प्रतिसाद मिळत नसल्याने आता विरोधकांकडून मोदी सरकारला लक्ष्य केलं जात आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयानेही केंद्र सरकारला लसीकरणाच्या धोरणावरून सुनावलं होतं. लसीकरणासंदर्भात उपस्थित झालेल्या लसीकरणाच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशातील लस उत्पादन आणि लसीकरणाच्या वेगावरही सरकारची भूमिका मांडली.

“कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसोबतची भारताची लढाई सुरूच आहे. जगातील इतर देशांप्रमाणे भारतही दुसऱ्या लाटेत मोठ्या संकटातून जात आहे. अनेकांनी आपल्या प्रिय माणसांना गमावलं आहे. शंभर वर्षानंतर ही महामारी आली आहे. इतक्या मोठ्या संकटाशी भारत अनेक आघाड्यांवर लढला आहे. रुग्णालये, उपचार सुविधा उभारण्यापासून ते ऑक्सिजन पुरवठ्यापर्यंत भारताने काम केलं. आरोग्य सुविधा उभारल्या. एप्रिल आणि मे मध्ये भारतात ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढली होती. ही मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले गेले. खूप कमी वेळात ऑक्सिजनचं उत्पादन १० टक्क्यांनी वाढवण्यात आलं. जगभरातून ऑक्सिजन मागवला. याच पद्धतीने जीवनरक्षण औषधांचं उत्पादनही वाढवण्यातं आलं. रुप बदलणाऱ्या या शत्रूविरोधात मास्क, सहा फूटांचं अंतर हेच सूत्र आहे,” असं आवाहन मोदींनी केलं

स्वदेशी बनावटीच्या लसींमुळे भारताने लसीकरण मोहिमेत वेग घेतला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं आहे. जनतेला संबोधून बोलत असताना पंतप्रधानांनी देशाच्या लसीकरणासंदर्भातल्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. त्याचवेळी मोदींनी पूर्वीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यातला फरकही दाखवून दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button