केंद्रीय तपास यंत्रणा भाजप नेत्यांच्या हातचे बाहुले : जयंत पाटील
सांगली: अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घरावर धाडी टाकल्या. अजित पवार यांना बदनाम करण्यासाठी या धाडी टाकल्या जात आहेत. भाजपचे नेते ज्याचं नाव घेतात त्याच्यावर धाड सीबीआय, ईडी आणि इन्कम टॅक्स कारवाई करत आहे. त्यामुळे सीबीआय, ईडी आणि इन्कम टॅक्स हे अधिकारी चालवत नाहीत तर भाजपचे नेते चालवतात, अशी टीका जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली. ते सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे बोलत होते. सांगलीच्या पलूस तालुक्यातील कुंडल येथे विधानपरिषदेचे पुणे पदवीधरचे आमदार आमदार अरुण अण्णा लाड यांचा भव्य नागरी सत्कार घेण्यात आला होता. या कार्यक्रमास मंत्री जयंत पाटील, विश्वजित कदम आदी उपस्थित होते. यावेळी पाटील यांनी भाजप वर टीकास्त्र केले.
आपल्या देशात दोन माणसं सगळे खाजगीकरण करण्यात व्यस्त आहेत. पण याचा फरक तुम्हाला पडणार आहे, कारण याचा फटका सर्वच क्षेत्रात महागाई वाढणार आहे, असं जयंत पाटील म्हणाले. सोयाबीनचा दर ११ हजार झाला असता शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळाले तर भाजपवाल्यांना ते सहन झालं नाही. त्यामुळे दर पाडला गेल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला. या देशात शेतकऱ्याच्या हातात काही जाऊ लागले तर भाजपला ते सहन होत नाही. भाजपचा हा चेहरा वारंवार दिसून येत आहे. या देशात शेतकऱ्याला चिरडून मारले तर हा पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच बोलत नाहीत. शेतकऱ्याचा गळा कापण्याच्या प्रयत्न करत असाल तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा जयंत पाटील यांनी दिला.
शेतकऱ्याच्यांसाठी जाचक कायदा येत आहेत. या कायद्यांना विरोध केला नाही तर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही. आपण आवाज उठवला तर सीबीआय इन्कम टॅक्स धाड टाकते, असं जयंत पाटील म्हणाले. या राज्यात छगन भुजबळ यांना अटक केली गेली होती. आज न्यायालयाने दोषमुक्त केल्यानं छगन भुजबळ यांनी काहीच घोटाळा केला नाही हे निष्पन्न झाले, असं जयंत पाटील म्हणाले.
महाराष्ट्र सरकार पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मागे उभे राहतंय. पण केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना मदत देण्यामध्ये आतापर्यंत कसलाही सहभाग नाही याचा आम्हाला खेद वाटतो. पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या दिल्या जाणाऱ्या मदतीवरुन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केंद्रावर टीका केसी होती. महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या भागांत तीन वेळा अतिवृष्टी झाली. पण केंद्र सरकारचं पथक नुकसान पाहणी करण्यासाठी खूप उशिरा आलं असं जयंत पाटील म्हणाले. केंद्र सरकारच्या मदतीची आणखी किती वेळ वाट पाहणार? तोवर राज्य सरकारला जितकी मदत करणे शक्य आहे तितकी मदत सरकार करेल, असं जयंत पाटील म्हणाले.
पंतप्रधानांना शेतकऱ्यांचा मृत्यूचे साधे दुःखही नाही
२०१४ साली जे गृहस्थ पंतप्रधान झाले त्याची मानसिकता या ७ वर्षांत बदलली आहे. शेतकऱ्यांना चिरडून जरी मारले तरी आपल्या देशाचे पंतप्रधान साधे दुःख व्यक्त करत नाहीत. निषेध व्यक्त करत नाहीत, ना खेद व्यक्त करतायत, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लखीमपूरमधील घटनेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला.
दररोज इंधन दरवाढ करण्याचे काम केंद्रातील सरकार करीत आहे. आपल्या भारतातील शेतकर्याला चार पैसे जास्त मिळाले पाहिजे अशी मानसिकता आपल्या सरकारची नाही. नेहमीच शेतकऱ्यांच्या विरोधात काम करून त्यांचा गळा घोटण्याचा काम भाजपा करत आहे. शेतकऱ्याच्या हातात चार पैसे मिळायला लागले की, भाजपच्या नेत्यांना ते सहन होत नाही. याची अनेक उदाहरणे आहेत, असे जयंत पाटील म्हणाले.
देशातील आजची परिस्थिती बदलली आहे. लखीमपूर सारख्या भागात लोकांना चिरडून टाकण्याची मानसिकता भाजपाची झाली आहे. देशाला एका वेगळ्या दिशेने हाकण्याचा कार्यक्रम चालू आहे. देशात आज सरकार विरोधात आवाज उठविला तर लगेच विविध चौकशीचा ससेमिरा मागे लागतो. कोणतेही पुरावे नसताना देखील आज राज्य सरकारला बदनाम करण्याचे काम केले जात आहे. लखीमपूर घटनेची तुलना जेव्हा आदरणीय शरद पवार साहेबांनी जालियनवाला बाग हत्याकांडशी केली, त्यानंतर देशातील सरकारने अजित पवार यांची चौकशी करण्याचे काम केले. त्यांना नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे. ईडीला भाजपचे नेते मार्गदर्शन करत आहेत, त्यानुसार सध्या राज्यात धाडसत्र सुरु आहे, अशी टीका जयंत पाटलांनी भाजप नेत्यांवर केली.