परदेशातून ऑक्सिजन आयात करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
नवी दिल्ली : करोना संक्रमणानं जगभर हाहाकार उडवलेला असतानाच देशात मेडिकल ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनची कमतरता भासत आहेत. याच दरम्यान केंद्र सरकारनं एक मोठा निर्णय घेत रुग्णांना दिलासा दिलाय. देशातील करोना संक्रमणाची परिस्थिती लक्षात घेता ५० हजार मॅट्रिक टन मेडिकल ऑक्सिजन परदेशातून आयात केला जाणार आहे. यासाठी लवकरच केंद्रातून टेंडर जारी केले जाणार आहेत.
केंद्र सरकारनं यासंबंधी माहिती दिली. कोविड १९ रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेता ५० हजार मॅट्रिक टन ऑक्सिजन मागवण्यासाठी लवकरच निविदा मागवल्या जातील. ऑक्सिजनचा सर्वाधिक तुटवडा भासणाऱ्या १२ राज्यांना चिन्हांकीत करण्यात आलंय. यामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पंजाब, हरयाणा आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे. यासंबंधीचे आदेश लवकरच आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात येतील. तसंच गृह मंत्रालयाकडून याची अधिसूचना जारी केली जाईल.
या दरम्यान केंद्राकडून राज्यांना ऑक्सिजनच्या योग्य आणि सावधानतापूर्वक वापर करण्याचा सल्ला दिला गेलाय. सोबतच, ऑक्सिजन वाया जाणार नाही, याची काळजी घेण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. देशात दररोज जवळपास ७ हजार मॅट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन करण्याची क्षमता आहे. मेडिकल आपात्कालीन परिस्थितीत स्टील संयंत्रांत वापरल्या जाणाऱ्या ऑक्सिजनलाही वापरात आणलं जातंय.