Top Newsफोकस

सीडीएस बिपीन रावत पंचत्वात विलीन; रावत दाम्पत्याच्या पार्थिवांना दोन्ही मुलींकडून मुखाग्नी

नवी दिल्ली: ‘अमर रहे… अमर रहे… जनरल अमर रहे’, ‘वंदे मातरम…’ ‘भारत माता की जय…’ ‘जब तक सूरज चांद रहेगा, बिपीनजी का नाम रहेगा…’ ‘बिपीनजी अमर रहे…. अमर रहे, अमर रहे….’च्या घोषणा देत आज देशाच्या अस्सल हिरोला दिल्लीच्या ब्रार स्क्वायर स्मशानभूमीत अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्या पार्थिवावरही याच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. जनरल बिपीन रावत यांच्या पार्थिवाला त्यांच्या कन्येने मुखाग्नी दिला अन् देशाचा श्वास थांबला… हजारो डोळ्यांतून अश्रू ओघळले… एका पर्वाचा अस्त झाला.

आज सायंकाळी ५ च्या सुमारास बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्या पार्थिवावर दिल्लीच्या ब्रार स्क्वायर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आला. रावत यांची अंत्ययात्रा स्मशानभूमीत आल्यावर त्यांना १७ तोफांची सलामी देऊन गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्यानंतर मंत्रोच्चारात लष्करी इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या कन्या कृतिका आणि तारिणी यांनी आपल्या मात्यापित्यांना मुखाग्नी दिला. कृतिका आणि तारिणी यांनी रावत आणि मधुलिका रावत यांच्या पार्थिवाला मुखाग्नी देताच अनेकांना अश्रू अनावर झाले होते.

सीडीएस बिपीन रावत यांच्या अंत्यसंस्कारासाठी हजारो लोक जमले होते. दिल्ली आणि आजपासच्या राज्यातूनही लोक आले होते. तसेच श्रीलंका, भूतान, नेपाळ आणि बांगलादेशातील सैन्याचे कमांडरही या वीर योद्ध्याला अखेरची सलामी देण्यासाठी आले होते. स्वत: देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे रावत यांच्या अंत्ययात्रेत सामिल झाले होते. राजनाथ सिंह यांनी रावत यांच्या पार्थिवावर पुष्प चक्र अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचं पार्थिव एक फुलांनी सजवलेल्या ट्रकमध्ये ठेवण्यात आलं होत. त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा निघाली. यावेळी दिल्लीकर या अंत्ययात्रेत सामिल जाले होते. तिन्ही सैन्य दलाचे अधिकारी या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. लोक हातात तिरंगा घेऊन ट्रकच्या मागे पळताना दिसत होते. यावेळी अमर रहे… अमर रहे… जनरल… जनरल अमर रहे, वंदे मातरम… भारत माता की जय… जब तक सूरज चांद रहेगा, बिपीनजी का नाम रहेगा… बिपीनजी अमर रहे…. अमर रहे, अमर रहे….च्या घोषणा दिल्या जात होत्या. अबालवृद्ध आणि तरुणही या अंत्ययात्रेत सामिल झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button