‘सीबीएसई’ बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द, बारावीची परीक्षा लांबणीवर
नवी दिल्ली : केंद्र सरकारने देखील दहावी आणि बारावीच्या परीक्षांसंदर्भातील महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. दरम्यान, बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सीबीएसई’ बोर्ड परीक्षांच्या संदर्भात १२ वाजता बैठक घेतली. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्यासह ‘सीबीएसई’चे सचिव आणि महत्त्वाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. यावेळी ‘सीबीएसई’च्या दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला तर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे देखील केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केले आहे.
परीक्षेसंदर्भात १ जून रोजी ‘सीबीएसई’ घेणार आढावा
दहावीचा निकाल सीबीएसई बोर्डाकडून वस्तूनिष्ठ पद्धतीनं तयार करण्यात आलेल्या मानाकांच्या आधारे जाहीर करण्यात येणार असून बारावीच्या परीक्षा घेण्याचा निर्णय अद्याप लांबणीवर टाकला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ‘सीबीएसई’ परीक्षांबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, आता १ जून रोजी ‘सीबीएसई’कडून कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे, तर परीक्षा घेण्यासंदर्भात १ जूनला परिस्थिती पाहून निर्णय देण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिली आहे.
सद्यस्थिती ‘सीबीएसई’ बोर्डाची लेखी परीक्षा ही ४ मे पासून होणार होती. मात्र देशात कोरोना बाधितांचा आकडा आणि कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने विद्यार्थ्यांकडून बोर्ड परीक्षा न घेण्याची मागणी सोशल मीडियावर सातत्याने होत होती. तर राजकीय, अभिनय क्षेत्रातील मंडळी जसे की, अभिनेता सोनू सूद, गायक अरमान मलिक, काँग्रेस नेते राहूल गांधी, प्रियांका गांधी, नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी परीक्षा रद्द करावी अन्यथा त्याला दुसरा कोणताही पर्याय शोधावा, अशी मागणी देखील लावून धरली होती. याचपार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांच्यासह झालेल्या बैठकीनंतर ‘सीबीएसई’ बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा तर दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.